65 वर्षांपूर्वी प्रभात : वनस्पतीला रंगदार करण्यात अपयश

ता. 24, माहे नोव्हेंबर, सन 1955

“आभार प्रदर्शन दिन’ अमेरिकेचा राष्ट्रीय सण 

न्यूयॉर्क, ता. 23 – 24 नोव्हेंबर रोजी साजरा होणार असलेला “आभार प्रदर्शन दिन’ (थॅंक्‍सगिव्हिंग डे) हा अमेरिकेचा एक वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत पुरातन असा सण आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात चौथ्या गुरुवारी हा सण अमेरिकन लोक पाळत असतात. भरघोस पीक आल्याबद्दल अमेरिकेतील आरंभीच्या वसाहतवाल्यांना वाटणारी कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी या सणाची मूळ सुरुवात झाली होती आणि या दिवशी राष्ट्रीय व वैयक्‍तिक सुखसमृद्धीसाठी परमेश्‍वराचे आभार मानण्याची पद्धत सर्रास रूढ झाली. 1621 साली हा सण पहिल्यांदा साजरा केला.

भारतात 40 हजार परदेशी नागरिक आहेत

नवी दिल्ली – 31 डिसेंबर 1954 च्या नोंदीनुसार भारतात 39,350 नागरिक आहेत, असे परराष्ट्र खात्याच्या उपमंत्र्यांनी आज लोकसभेत निवेदन केले. व्यापारी, मिशनरी व सामाजिक, वैद्यकीय कार्यात हे लोक बव्हंशी गुंतले आहेत.
जगातील अतिरूंद भुयारी रस्ता
बोस्टन – येथील “साउथ रेलरोड’ कंपनीच्या स्टेशनाजवळील गर्दीच्या भागाखालून एक 2400 फुटी भुयारी रस्ता नेला जाणार आहे. या रस्त्यावरून दररोज 1,20,000 मोटार गाड्या जातील असा अंदाज आहे. मॅजॅज्युसेट्‌सचे राज्यपाल क्रिस्तियन हर्टर यांनी येथे या भुयारी रस्त्याच्या खोदकामाला समारंभपूर्वक सुरुवात केली. हा रस्ता 1958 साली बांधून तयार होईल.

रेलगाडीत फक्‍त पहिला-तिसरा वर्ग

पाटणा – भारतीय रेलगाडीत फक्‍त पहिला व तिसरा वर्गच ठेवण्याचे सरकारचे धोरण आहे, असे रेल्वेबोर्डाचे चेअरमन श्री. पांडे म्हणाले.

वनस्पतीला रंगदार करण्यात अपयश 

नवी दिल्ली – वनस्पतीला रंगदार करण्यासंबंधात सरकार अपयशी ठरल्याबद्दल आज राज्यसभेत टीका करण्यात आली. ज्यांच्यावर हे काम सोपविले आहे त्यांना ते जमत नसेल तर एखादे बक्षीस जाहीर करून सरकार तज्ज्ञांना का संधी देत नाही, असे एका सदस्याने विचारले. ना. पंजाबराव यासंबंधी बोलताना म्हणाले, आमच्या संशोधकांचा प्रयत्न चालू आहे. काम काही सोपे नाही. तथापि, एखाद्याने सुयोग्य रंग शोधून काढला तर त्याला बक्षीस मिळेलच.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.