संक्रांतीच्या पर्वणीनिमित्त 1 लाख लोकांचे गंगास्नान
अलाहाबाद, ता. 14 – आज मकरसंक्रांतीच्या पर्वणीनिमित्त गंगा-यमुनेच्या संगमावर एक लाखापेक्षा अधिक लोकांनी स्नान केले. यात्रेकरूंना संगमापर्यंत नेण्यासाठी हजारो बोटी ये-जा करीत होत्या. आज माघमेळा उत्सवही सुरू झाला. यानंतरचे पर्वणीचे दिवस म्हणजे 24 जानेवारी, 17 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 7 मार्च हे आहेत.
पुण्यातील गुमास्ता कामगारांची किमान वेतनाची मागणी
पुणे – पुण्यातील शिवणकाम करणारे, कापड दुकानात काम करणारे व गुमास्ते यांना किमान वेतन कायदा त्वरित लागू करावा व किमान वेतन ठरवून द्यावे अशी मागणी दि. 12 रोजी भरलेल्या गुमास्तांच्या सभेत करण्यात आली. शिवण कामगार हे कंत्राटदार आहेत कामगार नाहीत, या मालकांच्या युक्तिवादाला पुण्याचे स्मॉलकॉज जज श्री. गोडबोले यांनी दिलेल्या निकालाने चांगलेच उत्तर मिळाले असून, शिवण कामगार हे कामगारच ठरले आहे.
मध्यमवर्गीयांची मुंबईत परिषद
मुंबई – मध्यमवर्गीयांची परिषद ता. 16 व 17 जानेवारी रोजी येथे भरणार आहे. देशामध्ये शेकडा 18 टक्के लोक मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्या या पहिल्या परिषदेत महागाई, बेकारी आणि घरांची तरतूद इत्यादी विषयावर चर्चा होईल. मध्यमवर्गीयांची एक संघटना स्थापन करून त्यांच्या प्रश्नांचा विचार करावा असेही या परिषदेच्या चालकांनी योजिले आहे.
फाशीच्या शिक्षा स्थगित केल्या
न्यूयॉर्क – बॅटिस्टांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांच्या फाशीची शिक्षा थोपवाव्यात असा आदेश क्यूबातील क्रांतिकारक राजवटीने दिल्याचे न्यूयॉर्क नभोवाणीवरून सांगण्यात आले. क्यूबाच्या अध्यक्षीय भवनाच्या प्रवक्त्याने सांगितले, की अध्यक्ष उरूशिया आणि बंडखोरांचे पुढारी फिडेल कॅस्ट्रो यांची चर्चा झाल्यानंतर ही घोषणा केली.
कुप्रसिद्ध दरोडेखोर मोहरामनिया ठार
इटवा- इटवा-कानपूर भागात सहकाऱ्यांसह धुमाकूळ घालणारा कुप्रसिद्ध दरोडेखोर मोहरामनिया ठार झाल्याचे वृत्त आहे. इटवा जिल्ह्यातील राहटाकपुखा खेड्यात ही चकमक घडली.