62 वर्षांपूर्वी प्रभात : माणसांच्या सहापट उंदीर

ता. 19, माहे फेब्रुवारी, सन 1959

फिल्म फिनान्स कॉर्पोरेशन व फिल्म संस्था स्थापन होणार

नवी दिल्ली, ता. 18 – वीस ते पंचवीस लाख रुपये भांडवल असलेले फिल्म फिनान्स कॉर्पोरेशन स्थापन करावयाचे असे भारत सरकारने ठरविले असल्याची घोषणा माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉ. केसकर यांनी आज राज्यसभेत केली. ते पुढे म्हणाले की, या कॉर्पोरेशनप्रमाणेच चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक अंगाचे शिक्षण देणारी संस्थाही काढण्यात येईल.

सिनेमोटोग्राफ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, चित्रपट चौकशी समितीने चित्रपट निर्मिती कौन्सिल, चित्रपट संस्था व चित्रपट फिनान्स कॉर्पोरेशन स्थापन करण्यात यावीत अशा शिफारशी केल्या आहेत. चित्रपट संस्थेची सविस्तर योजना करण्यासाठी खास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस या योजनेला चांगले स्वरूप येईल.

शिवराळ वृत्तपत्रांना बंदी,नियोजित मद्रासी कायदा

मद्रास – शिवराळ वृत्तपत्रांना बंदी करण्यासाठी कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे. संपादक मंडळींशी चर्चा करून असा कायदा विधान सभेत आणणार आहे, असे मद्रासचे अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी काल सांगितले. ए. बी. सी. संस्थेतर्फे भरविलेल्या भारतीय वृत्तपत्र इतिहास प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानावरून अर्थमंत्री बोलत होते. माहिती खात्याचे तेच प्रमुख आहेत. भारतीय वृत्तपत्रांच्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला आणि शिवराळ वृत्तपत्रांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्‍याचे दिग्दर्शन केले.

माणसांच्या सहापट उंदीर

नवी दिल्ली – भारतात मनुष्यापेक्षा उंदरांची संख्या 6 पट अधिक आहे. अन्नखात्याचे उपमंत्री एम. व्ही. कृष्णम्मा यांनी सांगितले की, भारतातील उंदरांची संख्या 240 कोटी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.