सिंधू नदीच्या पाण्याचे वाटप, न्यूयॉर्कमध्ये चर्चासत्र सुरू
वॉशिंग्टन, ता. 3 – सिंधू नदीच्या पाण्याचे वाटपासंबंधी भारत-पाक दरम्यान जो वाद निर्माण झाला आहे त्याबाबतच्या वाटाघाटी भारतीय शिष्टमंडळाने जागतिक बॅंकेशी काल सुरू केल्या आहेत.
वाटाघाटीत भाग घेणारे पाकिस्तानी शिष्टमंडळ अद्याप येथे आलेले नाही. ते पुढील आठवड्यात येईल. भारतीय शिष्टमंडळाने बॅंक अधिकाऱ्यांशी सुमारे पावणेतीन तास वाटाघाटी केल्या. बॅंकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व बॅंकेचे उपाध्यक्ष श्री. इलिप यांनी पत्करले होते.
भारतीय शिष्टमंडळात श्री. गुलाटी, डॉ. मल्होत्रा व बरकतराम ही भारतीय केंद्र सरकारच्या पाटबंधारे वीज खात्यातील अधिकारी मंडळी होती. या वाटाघाटीत भाग घेण्यासाठी पाकिस्तानी शिष्टमंडळ येत्या मंगळवार-बुधवारपर्यंत येईल अशी आशा बॅंकेच्या प्रवक्त्याने व्यक्त केली. हिंदी शिष्टमंडळ आजही वाटाघाटीसाठी जाणार आहे. कालच्या वाटाघाटीनंतर काढलेल्या पत्रकांत म्हटले आहे- सल्लामसलतीचे सत्र संपल्यावाचून पत्रक निघणार नाही.
राजेंद्रप्रसाद यांना आत्मचरित्राचे मराठी भाषांतर अर्पण
नवी दिल्ली – राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद आज 74 वर्षांचे झाले. त्यांना अभिवादन करून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन व महामंत्री श्री. नेहरू आज सकाळी राष्ट्रपतीभवनाकडे गेले. महामंत्री नेहरू यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ खाना दिला. त्यांच्या हिंदी आत्मचरित्राचे मराठी भाषांतर अर्पण करण्यात आले.
सिंहाबरोबर साध्या हाताने सामना
लंडन – एका आफ्रिकन खेडुताचा जॉर्ज पदक देऊन सर्वोच्च सन्मान करण्यात आला आहे. एका आईस व मुलास वाचविण्यासाठी त्याने सिंहाबरोबर हातात काहीही हत्यार नसता सामना दिला. डाका नावाचा हा खेडूत एका बाईच्या किंकाळ्या आणि सिंहांच्या गर्जना ऐकून जागा झाला. त्याने सिंहावर स्वारी केली व बुक्यांनी सिंहाच्या बरगड्या मोडण्याचा पराक्रम सुरू केला. सिंहाने मान वळवून त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात त्याचा मुलगा बंदुक घेऊन आला. त्यानंतर त्याने सिंहावर मात केली.