62 वर्षांपूर्वी प्रभात : नकाशापुरतीच सत्ता

ता. 25, माहे जानेवारी, सन 1959

भारताची राहणी अल्पशी सुधारली तरीदेखील प्रचंड बाजारपेठ मिळेल 

वॉशिंग्टन, ता. 24 – ““भारताच्या 40 कोटी लोकांचे राहणीमान अल्पसे जरी वाढले तरी अमेरिकेच्या निर्यातीसाठी फार प्रचंड बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल” असे अमेरिकेच्या व्यापार खात्याने प्रकट केले आहे. या खात्याच्या शिष्टमंडळाने उत्तर भारताचा दौरा केल्यानंतर हा अहवाल तयार केला आहे. भारताचे राहणीमान हळूहळू वाढले की, अमेरिकेच्या निर्यातीला विस्तृत असे क्षेत्र निश्‍चित उपलब्ध होईल.

स्त्रिया-मुलींची टिंगल करणाऱ्या 257 लोकांना दंड-कारावासाची शिक्षा 

पुणे- रस्त्यावर व इतर सार्वजनिक ठिकाणी स्त्रिया व मुली यांची टिंगल करणाऱ्या 302 लोकांना पुणे शहर पोलिसांनी गेल्यावर्षी पकडून त्यांचेवर खटले भरले. त्यापैकी 257 लोकांना 15 ते 100 रुपयांपर्यंत दंड आणि दंड न दिल्यास 7 ते 30 दिवसांपर्यंत शिक्षा देण्यात आल्या. बाकीच्यापैकी 24 निर्दोषी ठरले. एकाला समज देऊन सोडण्यात आले व 20 लोकांवरील खटले अजून चालू आहे.

नकाशापुरतीच सत्ता 

कराची – बगदाद करार संघटनेचे अधिवेशन चालू आहे. त्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ बगदाद करार संघटनेच्या क्षेत्राचा नकाशा दाखविण्यात आला आहे. या नकाशात बगदाद कराराचे क्षेत्र हिरव्या रंगात रंगविले असून त्यात इराकचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र इमारतीपुढील चित्रमालिकेमध्ये बगदाद करार संघटनेच्या प्रमुखांची तैलचित्रे ठेवण्यात आली आहेत त्यात इराकच्या अध्यक्षांचे तैलचित्र नाही. बगदाद करार संघटनेशी इराकने असहकार केला आहे.

पाच वर्षांत भारतात अणु-वीज केंद्र स्थापना 

नवी दिल्ली – येत्या पाच वर्षांत वीस मेगावॅट्‌स शक्‍तीचे अणुवीज केंद्र भारतात उभारणे शक्‍य होईल, असा विश्‍वास अणुशक्‍ती मंडळाचे अध्यक्ष डॉ. भाभा यांनी व्यक्‍त केला आहे. येथे भरलेल्या विज्ञान कॉंग्रेसचे प्रतिनिधीसमोर अणुशक्‍ती विकास कार्यक्रमासंबंधी बोलताना ते म्हणाले, तुर्भे येथील अणुशक्‍ती केंद्राने या वीज केंद्राचे उभारणीसंबंधी अभ्यास केला असून भारतीय नमुन्याची केंद्रे कशी असावीत ते ठरवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.