पंजाबमधील सातशे खासगी शाळा महिनाभर बंद राहणार
वार्षिक परीक्षासुद्धा होणार नाही
अंबाला, ता. 26 – मार्च महिन्याचे 20 तारखेपासून एक महिनाभर पंजाब राज्यातील सुमारे सातशे खासगी शाळा बंद पडतील असा रंग दिसतो. वार्षिक परीक्षासुद्धा घेण्यात येणार नाही. या प्रकरणी असे समजते की, पंजाब सरकारने फुकट शिक्षण योजनेत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना फी माफी दिली आहे आणि खासगी शाळांचे बाबत पक्षपात दाखविला आहे. सरकारी पक्षपाताचे निषेधार्थ खासगी शाळा महिनाभर बंद ठेवण्यात येणार आहे. पंजाबातील सरकारमान्य खासगी शाळा संघाच्या स्थायी समितीने या प्रकरणी लुधियाना येथे एक बैठक घेऊन परिस्थितीचा विचार केला आणि पक्षपाती हुकूमास आव्हान देण्याचा निर्णय घेतला.
शहरी उत्पन्नावर मर्यादा घालणार!
नवी दिल्ली – शहरी उत्पन्नावर मर्यादा घालण्याबाबत तसेच दलालीत होणाऱ्या प्राप्तीवर बंदी घालण्यासंबंधी कॉंग्रेसच्या नियोजन उपसमितीत विचार विनिमय चालू आहे. तसेच कर वसुली यंत्रणा समर्थ करण्यासंबंधीही विचार चालू आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुमारे 60 कोटी रुपये अधिक उपलब्ध व्हावेत म्हणून हा विचार चालू आहे.
पाकमध्ये आवश्यक वस्तूंचा तुटवडा
लाहोर – पाकिस्तानात जीवनावश्यक वस्तूंचा सर्वसाधारणपणे तुटवडा असून वस्तूंच्या किमती वाढत असल्याचे व काळाबाजार झाल्याचे वृत्तांत आपल्या कानी येत आहेत. आयुब खान म्हणाले, प्रत्येकाने स्वतःचे नियंत्रण निर्माण करून काळ्या बाजारास वाव न देण्याचा निर्धार केला पाहिजे.