62 वर्षांपूर्वी प्रभात : स्वतःचा मृत्युलेख स्वतः वाचणार

ता. 25, माहे फेब्रुवारी, सन 1959

संस्कृत भाषेने भारताचे ऐक्‍यसंवर्धन केले पंडितजींचे विचार

नवी दिल्ली, ता. 24 – भारतात संस्कृत भाषेने जे कार्य केले आहे तसे जगात क्‍वचितच एखाद्या भाषेने मानवी इतिहासात केले असेल, असे विचार पंतप्रधान पं. नेहरू यांनी येथे आझाद स्मृती व्याख्यान मालेत बोलताना व्यक्‍त केले.

भारताची परंपरा सांगताना ते म्हणाले, संस्कृत भाषेमुळे केवळ उच्च विचार, उत्तम साहित्य प्रसृत झाले असे नव्हे, तर भारताचे ऐक्‍यसंवर्धनही झाले. राजकीय विभागणी असूनही भारत एकसंघ राहिला. हजारो वर्षे रामायण-महाभारताने सर्व भारतीयांना मोहिनी घातली आहे. भारतीयांचे जीवन त्यांनी व्यापले आहे.

पंडितजी म्हणाले, आमच्या लोकांना बुद्ध, उपनिषदे आणि इतर महान ग्रंथांचा विसर पडला तर आमचे जीवन कसे बनेल कुणास ठाऊक! आपले जीवन उद्‌ध्वस्त होईल. भारत हा खऱ्या अर्थाने “भारत’ राहणारच नाही. तेजस्वी परंपरा नष्ट होईल.

वन्य विभागांतून रोगांचे निर्मूलन

नवी दिल्ली – वन्य विभागातील मलेरिया व कुष्ठरोग या रोगांविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी त्या भागांची खास पाहणी करण्यात आली असून, या रोगांविरुद्ध प्रतिबंधक उपाय योजने, त्यांना आळा घालणे तसेच त्यावर उपाययोजना करणे यासाठी निरनिराळ्या राज्यांत केंद्रे स्थापण्यात आली आहेत.

मुंबईमध्ये अशा खेड्यांतील प्रत्येक घरांतून डी. डी. टी. चा फवारा मारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अशा विभागातील लोकांना बी. सी. जी. लस टोचण्यात येत आहे. कुष्ठरोगाचे निराकरण करण्यासाठी डी. डी. एस. च्या गोळ्या मोफत वाटण्यासाठी म्हणून दवाखान्यांतून येत आहेत. वन्य जमातीतील लोकांना औषधे वाटण्यात आली आहे.

स्वतःचा मृत्युलेख स्वतः वाचणार

लंडन – आपला मृत्युलेख आपणच टेलिव्हिजनवर वाचून दाखविण्याचे काम 87 वर्षांचे ब्रिटीश तत्त्वज्ञ बर्ट्रोड्र रसेल करणार आहेत. त्यांनी हा मृत्युलेख 1937 सालीच लिहिला. या मृत्युलेखात त्यांनी म्हटले आहे- 1 जून 1962 रोजी मी मरेन अशी अपेक्षा आहे. कारण माझी 90 वर्षे उलटून जातात. मरायला योग्य असे हे वर्ष आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.