आता निवडणुका घेणे म्हणजे केंद्रीय हस्तक्षेप स्वीकारणे
मदुराई, ता. 16 – “”सध्या केरळमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेणे म्हणजे एक प्रकारे मध्यवर्ती हस्तक्षेप स्वीकारणेच होय म्हणून आता निवडणुका घेण्याची कल्पना स्वीकारावयाची नाही, असे कम्युनिस्टांच्या राष्ट्रीय कौन्सिलला वाटत असल्याने कम्युनिस्ट खासदार व राष्ट्रीय कौन्सिलच्या सदस्य रेणू चक्रवर्ती यांनी येथे दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, तथाकथित बहुजन उठाव काय आहे ते मी प्रत्यक्ष पाहिले आणि हा जर बहुजन समाजांचा उठाव असेल तर साम्यवादीच्या बाजूने याहून मोठ्या गोष्टी घडू शकतील.
सूर्यावर डाग पडल्याने रेडिओ दळणवळणात विक्षेप
लंडन – सूर्यावर मोठा डाग पडल्याने जगभर रेडिओच्या दळणवळणात काल मध्यरात्रीनंतर विक्षेप निर्माण झाला. धुरकट काचेच्या साहाय्याने हा डाग दिसत होता. हा प्रकार काही आठवडे मधेमधे चालूच राहील असे न्यूयॉर्कची तज्ज्ञ मंडळी म्हणतात. काल मध्यरात्रीनंतर भारतीय तारायंत्राचे दळणवळण 12 तास बंद पडले व बाहेरच्या जगाशी संबंध तुटला होता.
बिन खिडक्यांची इमारत
न्यूयॉर्क – सोव्हिएत प्रदर्शन न्यूयॉर्कमधील कोलंबस सर्कल या मध्यवस्तीतील एका भव्य इमारतीत भरविले असून, त्या इमारतीला अजिबात खिडक्या नाहीत. 35000 विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात प्रदर्शनात मांडलेल्या 10 हजार वस्तू पाहण्याची सोय केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनने केलेल्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचे अमेरिकन लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर दर्शन घडविणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे.
निपाणीत छत्र्या चोरीचे सत्र
निपाणी – शहरात छत्र्या चोरण्याचे सत्र सुरू झाले होते पण पोलिसांनी या छत्रीचोरांचा छळा लावून त्यांना पकडले आहे. चोरीच्या छत्र्या मिळाल्या आहेत.
अंधश्रद्धेचा बळी!
कोल्हापूर – उदगावच्या (ता. शिरोळ) एका स्त्रीने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीस स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे घराजवळच्या विहिरीत टाकून बळी दिल्याचे वृत्त आहे. ता. 9 रोजी तिच्या स्वप्नात एक बैरागी आला व त्याने “तुझी मुलगी मला पाहिजे. ती बळी दे’ असे त्या बाईस सांगितले. बाईने लागलीच उठून मुलीला जवळच्या विहिरीत फेकून दिले व सकाळी तिचे प्रेत जमिनीत पुरून टाकले.