उत्पादन वाढले पण कामगारांचे वेतन वाढले नाही- इंटकची तक्रार
दिब्रुगड, ता. 8 – राष्ट्रीय उत्पन्नांत व उत्पादनांत वाढ झाली पण त्या मानाने कामगारांचे वेतन मात्र वाढले नाही, अशी तक्रार इंटकचे सरचिटणीस वासवडा यांनी अहवालात केली आहे. सरकारी क्षेत्रात कामगारांवर अधिक जबाबदारी असूनही या कारखान्यात व्यवस्थापकीय जबाबदारी घेणारी माणसे कामगार हित पाहत नाहीत. ही माणसे बदलनेच जरूरीचे आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
शाळा-कॉलेजांतून संगीत हा सक्तीचा विषय हवा
इंदुर – नभोवाणी मंत्री डॉ. केसकर यांनी येथे भाषण करून असे सांगितले की, सर्व शाळांतून व कॉलेजांतून संगीत हा सक्तीचा विषय असला पाहिजे. भारतीय संगीत लोकप्रिय करण्याचा हाच एक उत्तम
मार्ग आहे.
राष्ट्रपती, राज्यपालांना जादा अधिकार नकोत!
नवी दिल्ली – “भारतातील कायदा व लोकशाही’ या विषयावरील परिसंवादात भाषण करताना लोकसभेचे स्पीकर अनंतशयनम् आयंगार यांनी असे मत व्यक्त केले की, “राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना आणीबाणीचे वेळी वापरण्यासाठी जे जादा अधिकार देण्यात आले आहेत त्यांना माझा विरोध आहे. वटहुकूम काढते वेळी पार्लमेंटला विश्वासात घेतले जात नाही. पार्लमेंटच्या हक्कावर हे आक्रमणच आहे.
इराकच्या उपपंतप्रधानास फाशीची शिक्षा ठोठावली
दमास्कस – बगदादच्या लष्करी कोर्टाने, माजी उपपंतप्रधान कर्नल अब्दुल सलम महंमद अरेफ यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे, अशी वार्ता बगदाद नभोवाणीवर सांगण्यात आली. नभोवाणीवर या खटल्याची हकीकतही सांगण्यात आली असून फाशीच्या शिक्षेबरोबरच आरोपीस दया दाखविण्याचीही शिफारस करण्यात आलेली आहे.