हिंदुस्थान एअरक्रॅफ्टचे पुष्पक विमान
बंगलोर, ता. 3 – दि हिंदुस्थान एअरक्रॅफ्ट लिमिटेडने अल्पकाळात तयार केलेल्या एका नव्या साध्या व सुंदर अशा विविधोपयोगी विमानास “पुष्पक’ असे नाव देण्यात आले आहे. रामायण, महाभारत, कवि कालिदासांच्या कृति यातून विविध तऱ्हेच्या पक्ष्यांची नावे, पंतप्रधान नेहरू, जनसेवक, जनपंखा, जनता, भारत कुसूम, भारत पुष्प, यासारखी देशप्रेम सूचित करणारी नावे, अरविंद मित्र, सूर्यफूल, गुलन, कमल, मलिका, परिजिता, पुष्पा, पुष्पलता, पुष्पतरंगिणी, सौगंधिका या सारखी फुलांची नावे मिळून एक हजार नावांतून अखेरीस या नावाची निवड केली आहे.
कैद्यांना पॅरोलवर सोडण्याची
तरतूद विधेयक मंजूर झाले
मुंबई – कैद्यांना पॅरोलवर सोडणे, तरटाचे कपडे व शासनासाठी वेगळे अन्न देणे या शिक्षा रद्द करण्याची तरतूद करणारे विधेयक आज मुंबई विधानसभेने संमत केले. 1894 चा तुरूंग कायदा, 1874 चा सिव्हिल जेल कायदा सर्व द्विभाषिकाला लागू करणारे पहिले सरकारी विधेयक मुंबई विधानसभेत संमत झाले.
महिलांना मताधिकार देण्यास पुरुषांचा विरोध
स्वित्झर्लंडमधील सार्वमत
बर्न – स्त्रियांना मतदानाचा हक्क देऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमध्ये या प्रश्नावर सर्व पुरुषांचे मतदान घेण्यात आले होते. सार्वमताचे मतदान दोन दिवस चालू होते. ते काल पुरे झाले आणि 924 वि. 2330 मतांनी स्त्रियांना मताधिकार देऊ नये, असा निकाल लागला.
अमेरिकन खासगी भांडवलाचा भारताकडे लोंढा
नवी दिल्ली – अमेरिकेतून भारताकडे खासगी भांडवलाचा लोंढा सुरू होणार असा रंग दिसत आहे. अमेरिकन भांडवलवाल्यांचे पैसे भारतात गुंतविण्याचे प्रकरणी अमेरिकन व भारत सरकार विचार करीत आहे. अमेरिकन परराष्ट्र खात्याचे हेन्री कीअर्नस हे दिल्लीत आले असता असे म्हणाले होते की, भारताच्या विकासासाठी अमेरिकेतील खासगी भांडवल मिळण्याची शक्यता आहे. लंडनमधूनही सिंद्री खत कारखान्यास खासगी भांडवल मिळण्याची शक्यता बोलून दाखविण्यात येत आहे.