विज्ञानाची मक्तेदारी म्हणजेच नवी साम्राज्यवादी प्रवृत्ती होय
नवी दिल्ली, ता. 31 – दक्षिण आफ्रिकेतील सरकारला मानवी प्रतिष्ठेची व चालू युगाच्या स्वरूपाची किंमत कळली नाही हेच दक्षिण आफ्रिकेतील घटनांनी सिद्ध केले आहे, असे प्रे. नासर यांनी संसदेच्या संयुक्त बैठकी पुढील भाषणात सांगितले.
ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा नाश करून रक्तपातही करता येईल असे आफ्रिकी सरकारला वाटते हेच त्यांच्या वर्णविषयक धोरणाचे सार आहे. मागास राष्ट्रांनी आपल्या उद्धारासाठी खूपच परिश्रम करणे आवश्यक आहे. प्रभुत्व गाजविण्याचे साधन म्हणून विज्ञानाची मक्तेदारी निर्माण करण्याच्या बड्यांच्या इच्छेबाबत सावध राहिले पाहिजे. विज्ञानाची मक्तेदारी ही नवी साम्राज्यवादी प्रवृत्ती होय असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
अणुशक्ती क्षेत्रात भारत आणि डेन्मार्क यांचे सहकार्य
नवी दिल्ली – अणुशक्तीच्या शांतताकालीन उपयोगाच्या कामी भारत व डेन्मार्क परस्परांशी सहकार्य करतील. पं. नेहरू म्हणाले, नील्स भोर हे अणुसंशोधन क्षेत्रात जगद्विख्यात आहेत. प्रत्यक्ष कार्यात डेन्मार्क पुढे नसला तरी संशोधन व सिद्धांतविषय क्षेत्रात प्रगत आहे. या देशाशी माहिती देवाण-घेवाणीने भारताचा फायदा होईल.
कालवा करारावर सह्या होण्यात अडचण
नवी दिल्ली – कालव्याच्या पाण्याबाबतच्या भारत-पाक दरम्यानच्या न्यूयॉर्कमध्ये चाललेल्या वाटाघाटीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. चिनाबच्या उपनद्यांच्या पाण्यावर साठवणीसाठी बांध घालण्याबाबत मतभेद निर्माण झाले असल्याने पं. नेहरू लंडनमध्ये (राष्ट्रकुल परिषदेत जातील तेव्हा) पाणी करारावर सह्या करतील असे वाटत नाही.
सिक्कीमच्या संरक्षणाचा प्रश्न
नवी दिल्ली – सिक्कीमच्या संरक्षणाची जबाबदारी भारताने आपल्यावर घेतल्यामुळे सिक्कीमच्या संरक्षणाची व्यवस्था स्वतंत्रपणे वाढविण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे पंतप्रधान पं. नेहरू यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.
नवे आयात धोरण
नवी दिल्ली – प्रत्यक्ष व्यापर करणाऱ्यांना व जुने व्यापारी आणि 1 वर्षाच्या मुदतीचे परवाने, आवश्यक कच्चा माल व सुट्या भागाच्या आयातीत थोडीशी वाढ, प्रत्यक्ष व्यापार करणाऱ्यांसाठी आयातीच्या वस्तूंच्या यादीत वाढ आणि काही पदार्थांच्या परवान्याच्या मुदतीत वाढ अशी या नव्या धोरणाची वैशिष्ट्ये आहेत.