49 वर्षांपूर्वी प्रभात | ताशी 92 किमी वेगाचे वादळ

ता. 18, माहे मे, सन 1972

ताशी 92 किमी वेगाचे वादळ

पुणे – पुणे शहर व आजूबाजूच्या भागास आज वेगवान वादळाने व मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वादळ व पावसाने झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याचे कळते. आजच्या पावसाने जागोजागी प्रचंड वृक्ष उन्मळून पडले. जागोजागी विजेच्या तारा व टेलिफोनच्या तारा तुटल्या. यामुळे शहरातील बराच भाग अंधारात होता. टेलिफोन दळणवळण निकालात निघाले होते.

हीच युद्धबंदी रेषा

नवी दिल्ली – काश्‍मीरमधील युद्धबंदी रेषेविषयी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान मतैक्‍य झाले नाही. यामुळे काश्‍मीरमधील युनोच्या निरीक्षकांना काही करता आले नाही, ते गप्प आहेत, असे विदेशमंत्री स्वर्णसिंग यांनी सांगितले. 17 डिसेंबर 1971 साली नवी युद्धबंदी रेषा बनली. युद्धबंदीची घोषणा इंदिरा गांधी यांनी केली व ज. खान यांनी ती मान्य केली. या सर्व परिस्थितीची कल्पना युनोच्या प्रमुख लष्करी निरीक्षकास दिलेली आहे.

भारतीय घटना परिपूर्ण आहे, बदलाची गरज नाही

पुणे- “भारताची घटना समितीतील माणसे हिमालयाइतकी मोठी, अत्यंत दूरदृष्टी असणारी होती व केंद्र सरकार बलवान राहील अशी योजना त्यांनी सहेतुक केली होती. कारण भारतीय सरकारपुढे सर्व घटक राज्यांचे चित्र असते आणि ज्याप्रमाणे आई दुबळ्या मुलाकडे जास्त लक्ष पुरविते त्याप्रमाणे भारतीय सरकारने मागासलेल्या, अविकसित राज्यांबद्दल सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवणे अत्यंत योग्यच आहे, तेव्हा घटक राज्ये आणि केंद्र सरकार यांनी आपल्या समस्या परस्परांचे दृष्टिकोन समजावून घेऊन; परस्परांविषयी सहानुभूती व विश्‍वास बाळगून सोडविला पाहिजे; मग आपल्या घटनेत बदल करण्याची बिलकूल आवश्‍यकता भासणार नाही इतकी ती परिपूर्ण आहे’, असे उद्‌गार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. त्र्यं. कृ. टोपे यांनी “केंद्र सरकार-घटकराज्ये परस्परसंबंध’ या विषयावर बोलताना काढले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.