49 वर्षांपूर्वी प्रभात | मोठ्या किमतीच्या नोटा रद्द करा

ता. 7, माहे मे, सन 1972

कारणाशिवाय लढल्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला,पाकचे माजी एअर मार्शल नूरखान यांचे मत

नवी दिल्ली, ता. 6 – पाकिस्तानच्या हवाई दलाचे माजी प्रमुख एअर मार्शल नूरखान यांनी म्हटले आहे की, गेल्या भारत-पाक युद्धात पूर्व व पश्‍चिम दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानचा जो पराभव झाला, त्याला कारण म्हणजे “आपण कारणाशिवाय लढलो!’ कराची येथील एका साप्ताहिकात त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

ते म्हणतात, “आपल्याजवळ जरी दहा लक्ष सैनिक असते, तरी आपण पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात पराभूत झालो असतो.’ पाकिस्तानी ध्येयवादाचे रक्षण, हे युद्धाचे कारण होऊ शकत नाही काय, असे विचारले असता ते म्हणाले, “जर जनतेनेच तो ध्येयवाद नाकारला तर लष्कर तरी काय करू शकणार? याबाबत जनतेला काहीही दोष देता येणार नाही. आपल्याच रक्षकांकडून आपल्या बांधवांची होणारी हत्या कोणीच सहन करू शकणार नाही.’

काश्‍मिरातील लढाई थांबली

नवी दिल्ली – काल सकाळी काश्‍मीरमध्ये कईयानजवळ सुरू झालेली भारत-पाक लढाई आता थांबली आहे. आज रात्री संरक्षण खात्याच्या एका प्रवक्‍त्याने हे जाहीर केले आहे. संरक्षण खात्याच्या गोटातून सांगण्यात आले की, भारत व पाकिस्तान यांच्या येथील मुख्य सैनिकी ठाण्यांनी एकमेकांशी संपर्क साधला नंतर युद्ध तहकुबीचे आदेश देण्यात आले. आज दिवसा दोन्हीकडून मधूनमधून गोळीबार चालू होता.

काश्‍मीरबाबत सौदा होऊ देणार नाही!

भागलपूर (बिहार) – “एक तृतीयांश काश्‍मीरची किंमत देऊन जर भारत सरकार पाकिस्तानची फसवी मैत्री विकत घेणार असेल, तर जनता ते चालू देणार नाही.’ असा इशारा जनसंघाचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकारला दिला.

मोठ्या किमतीच्या नोटा रद्द करा

भागलपूर – काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोठ्या नोटा रद्द कराव्यात अशी मागणी जनसंघाचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी केली. वांछू समितीने या विषयी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.