49 वर्षांपूर्वी प्रभात | ट्रॅक्‍टर उत्पादनासाठी कर्ज

ता. 5, माहे मे, सन 1972

महाराष्ट्रात सुवर्णसाठे आढळले; कोलारी, मोखबार्दी, पुलार भागांत उत्खनन

नवी दिल्ली, दि. 4 –महाराष्ट्रातील कोलारी, मोखबार्दी व पुलार भागांमध्ये सुवर्ण खनिजाचे थर आढळले, असे भिवापूर पौनी भागात सुवर्णासाठी केलेल्या उत्खननात दिसून आले, अशी माहिती केंद्रीय पोलाद खाण मंत्री श्री. एस. मोहन कुमारमंगलम यांनी आज लोकसभेत बोलताना दिली.

उत्खननानंतर कोलारी येथील नमुन्याचे पृथक्‍करण केल्यावर एक मीटर जाडीच्या व 125 मीटर लांबीच्या सुवर्ण खनिज पट्ट्यांत दर टनामागे 6.9 ग्रॅम सोने आढळले आहे.
देशातील सुवर्ण खाणींचे प्रायोगिक उत्खनन भारतीय भूगर्भशास्त्र पाहणी विभागाने देशातील पहिल्या पंचवार्षिक योजनेनुसार सुवर्णासाठी पद्धतशीर पाहणी करण्याचे काम करीत आहे, अशी माहिती पोलाद व खाण खात्याचे राज्यमंत्री श्री. शाह नवाझ खान यांनी आज लोकसभेत दिली. म्हैसूर, बिहारमधील सिंधभूम जिल्हा व महाराष्ट्राच्या नागापूर जिल्ह्यातील भिवापूर येथे सोन्याच्या शोधासाठी उत्खनन चालू आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

प्रा. शिक्षकांना पगार नाही

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या प्रा. शिक्षकांना अद्याप पगार आदा झाला नाही, त्यामुळे शेकडो शिक्षक जिल्हा परिषदेच्या कार्यालयाकडे चौकशी करून निराशेने परत जात आहेत.
शाळांना सुट्या सुरू झाल्या; परंतु पगाराअभावी कुटुंबीयांना गावी पाठविणे शक्‍य नसल्याने ते या गैरकारभाराबद्दल तीव्र निषेध व्यक्त करीत आहेत.

ट्रॅक्‍टर उत्पादनासाठी कर्ज

नवी दिल्ली –भारतातील ट्रॅक्‍टर्सचे उत्पादन वाढविण्यासाठी अमेरिकेने कर्ज मंजूर केले आहे. तसा करार झाला असून, पी. एल. 480 निधीतून त्यासाठी 90 लक्ष रुपये मिळणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.