येते दोन महिने बिकट आहेत!
नवी दिल्ली, ता. 21 – देशातील आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे आणि येते दोन महिने तर आणखी बिकट असतील, असा इशारा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिला. लोकांना आवाहन करताना इंदिरा गांधी म्हणाल्या, भडकती महागाई आणि धान्याचा तुटवडा याला लोकांना तोंड द्यावे लागणार आहे.
लोकांना धन्यवाद!
लोक कठीण परिस्थितीत तोंड देत आहेत, याबद्दल त्यांना इंदिराजींनी धन्यवाद दिले. “आपली जनता धन्य आहे’, असे त्या म्हणाल्या. इंदिराजींनी घाऊक व्यापार ताब्यात घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
झोपडपट्टी व बेकायदा बांधकाम; धोरण ठरणार
पुणे – झोपडपट्टी व पर्वती पायथा वसाहतीसंबंधी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने धोरण आखून द्यावे, अशी शिफारस स्थायी समितीच्या बैठकीत केल्याचे समजते. ही वसाहत पाडू नये परंतु पाडलेली घरे परत बांधू देऊ नयेत असा सर्वसाधारण सूर समितीत निघाला. तथापि, बिगर परवाना बांधकाम व झोपडपट्ट्यांबाबत धोरण सर्वसाधारण सभेने
आखून द्यावे.
पाकिस्तान्यांची हकालपट्टी
रावळपिंडी – “अफगाणिस्तानमध्ये वास्तव्य करीत असलेल्या पाकिस्तान्यांनी ताबडतोब अफगाणिस्तानातून चालते व्हावे’, असा आदेश अफगाणिस्तानच्या नव्या लष्करी राज्यशासनाने दिला आहे. या निर्णयाचा परिणाम काबुलमधील पाकिस्तान्यांवर होणार आहे. अफगाणिस्तानमध्ये एक हजार पाकिस्तानी राहात असावेत असा अंदाज आहे. अफगाणिस्तानमध्ये राजकीय आश्रय घेतलेल्या पाकिस्तान्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार किंवा नाही हे ताबडतोब समजू शकले नाही. या पाकिस्तान्यांमध्ये नॅशनल अवामी पार्टी या विरोधी पक्षाचे सेक्रेटरी अजमल खइक यांचाही
समावेश आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
पुणे – चिखलवाडी भाग खडकी येथे 6 ते 7 हजारांची वस्ती आहे. सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी आहेत, ते फक्त सहा खोल्यांत शिकतात. शाळेसाठी दुसरा मजला बांधा असे शिक्षण मंडळास व महापालिकेस सांगून पाहिले. योजनेत तशी तरतूद आहे पण जनावरांच्या कोंडवाड्याप्रमाणे मुले शिकत आहेत.