कंबोडियावरील बॉम्बहल्ले थांबविण्याचा हुकूम देण्यास नकार
वॉशिंग्टन, ता. 2 – अमेरिकन सुप्रीम कोर्टाचे न्या. थरगुड मार्शल यांनी कंबोडियावरील अमेरिकन बॉम्बहल्ले ताबडतोब थांबविण्याचा हुकूम देण्यास नकार दिला आहे अशा तऱ्हेचा हुकूम दिल्यास मी न्यायालयीन अधिकाराचे अतिक्रमण केल्यासारखे होणार आहे. नागरिक हक्क संघटनेच्या कॉंग्रेस प्रतिनिधी एलिझाबेथ होल्डझमन यांनी सुप्रीम कोर्टाकडे याबाबत अपील केले होते.
केवळ सहलीसाठी भारतात जाण्यास बंदी
नवी दिल्ली – बांगला देश सरकारने जे नवे पासपोर्ट नियम प्रसिद्ध केले आहेत त्या नियमानुसार बांगलादेशीय नागरिकांना भारतात सहलीसाठी जाण्यास परवानगी मिळणार नाही. इतर पासपोर्टधारकांना फक्त एकदा भारतात जाता येईल. हे नियम सरकारी नोकर, विद्यार्थी, व्यापाऱ्यांना लागू नाही.
पाकमार्गे युरोपकडे चिनी विमान वाहतूक सुरू होणार
कराची – पाकिस्तानमार्गे चीनची हवाई वाहतूक युरोपकडे लवकरच चालू होणार आहे. आतापर्यंत चीनची विमान वाहतूक फक्त मॉस्कोकडे चालू होती. नवीन विमान वाहतूक साप्ताहिक चालू राहील. पाक विमान वाहतूक व फ्रेंच विमान वाहतूक पेकिंगपर्यंत सुरू राहील.
ब्रिटनचा सामाजिक बाजारपेठेत प्रवेश फायदेशीर
लंडन – युरोपियन सामुदायिक बाजार पेठेत ब्रिटनने प्रवेश केला तो राष्ट्रकुलाला फायदेशीरच ठरला आहे, असे ब्रिटिश पंतप्रधान मि. हिथ यांनी काल ओटावा येथे सांगितले. हा बदल एकंदरीने चांगला आहे. यामुळे युरोपशी ब्रिटनचा व राष्ट्रकुलातील राष्ट्रांचा व्यापार वाढू शकेल.