48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा

ता. 30, माहे जुलै, सन 1973

तरुणांनी नागरी जीवन सुधारण्याचा प्रयत्न करावा

पुणे, ता. 29 – “कायदा, इतरांचे हक्‍क व स्त्रिया यांचा मान राखणे, नियमितपणाने वागणे या सूत्रांच्या आधारे नागरी जीवन सुधारण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा’, असे आवाहन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू रॅंग्लर महाजनी यांनी केले. ते म्हणाले, बाष्पशक्‍ती, विद्युतशक्‍ती व अणुशक्‍ती यांच्याप्रमाणे युवकशक्‍ती ही चौथी शक्‍ती आहे व ही शक्‍ती इतर तीन शक्‍तींना ताब्यात ठेवून जनतेचे कल्याण करू शकेल.

मंत्र्याच्या लाचलुचपतीला आळा कोण घालणार?

मदुरांताबम (तामिळनाडू) – केंद्रीय औद्योगिक विकास मंत्री सी. सुब्रह्मण्यम येथे म्हणाले, राजकीय पक्ष यंत्रणेत जी लाचलुचपत बोकाळली आहे ती दूर करण्यासाठी देशात आर्थिक पुनरुज्जीवन करणे आवश्‍यक आहे. सत्तेवरच असलेल्या राजकारणी व्यक्‍तीच्या लाचलुचपतीला कोण आळा घालणार?

राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा

पुणे – स्वतःचे जीवनाचा त्यागही राष्ट्रोद्धारासाठी करणे यात जीवनाचे परमश्रेष्ठत्व साठवलेले आहे, असे मत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्‍त केले. सध्या स्वातंत्र्यदिन समारंभ फक्‍त साजरे करण्यातच आपण धन्यता मानू लागलो आहोत. मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या अर्थाकडे त्यामुळे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

बांगला देशाला जगातील सर्व देशांनी मान्यता द्यावी

ब्रिओनी – ज्या राष्ट्रांनी अद्याप बांगला देशाला मान्यता दिली नसेल त्यांनी ती लवकरात लवकर द्यावी. तसेच युद्धामुळे ढासळलेली परिस्थिती सुधारण्यासाठी बांगलादेशाला मदत करावी, अशी सूचना युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांनी येथे केली. जगातील सर्व भागातील देश लवकरच बांगला देशाला मान्यता देतील अशी मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.