48 वर्षांपूर्वी प्रभात : पुन्हा “पुणे बंद’ हरताळाचा संभव

ता. 24, माहे जुलै, सन 1973

महाराष्ट्रात पंचायत राज्याचा प्रयोग यशस्वी

सातारा, ता. 23 – “महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांनी व पंचायत समित्यांनी आपल्या अंगीकृत कार्यात गेल्या दहा वर्षांत उल्लेखनीय प्रगती केल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात पंचायत राज्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे, हे स्पष्ट आहे’, असे मत महाराष्ट्राचे वित्त, कामगार व ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री शंकरराव पाटील यांनी व्यक्‍त केले.

पुन्हा “पुणे बंद’ हरताळाचा संभव

पुणे – पुणे बंदचा कार्यक्रम यशस्वी झाला. पण महागाई व जनतेची लुटमार थांबली नाही. म्हणून धान्यकपात विरोधी कामगार संघर्ष समिती पुणे हरताळ पाळण्याचा विचार करीत आहे. या समितीची बैठक 26 जुलै रोजी होणार असून लढ्याविषयीचा पुढील कार्यक्रम त्यावेळी ठरविला जाईल.

सरन्यायाधीशांच्या नेमणुकीला आव्हान

नवी दिल्ली – भारताच्या सरन्यायाधीशपदी ए. एन. रे यांच्या नेमणुकीला आव्हान देणारे चार “रिट’ अर्ज आज दिल्ली हायकोर्टाने दाखल करून घेतले. अर्जानुसार रे यांची नेमणूक बेकायदेशीर, घटनेशी विसंगत व अयोग्य आहे. कारण घटनेच्या 124(2) कलमाप्रमाणे राष्ट्राध्यक्षांनी या नेमणुकीपूर्वी सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट यांच्या न्यायाधीशांचा सल्ला घ्यावयास हवा होता. तो त्यांनी घेतला नाही.

मुळा धरण कालव्याचे पाणी मिळवण्यासाठी सत्याग्रह

पुणे – मुळा धरण उजव्या कालव्याचे पाणी वांबोरी व इतर 15 गावांना मिळावे, असा प्रयत्न कृती समिती करणार आहे. मुळा धरण उजव्या कालव्याचे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न म्हणून यापुढेही सत्याग्रहाचे कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच मुळा उजव्या कॅनॉलचा पाट फोडण्याचा सत्याग्रह लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.