बांगलादेशात राजकीय स्वातंत्र्याचा अंत
ढाक्का, दि. 30 – बांगलादेशात राजकीय बंदी घालण्यात आली असून राजकीय कार्य बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष खोंडकर मुश्ताक अहमद यांनी आज सायंकाळी एका वटहुकुमाद्वारे हे जाहीर केले. अशा रितीने देशातील सुमारे 6 वर्षे चाललेले घटनात्मक राजकीय कार्य संपुष्टात आले.
या वटहुकुमात म्हटले आहे की, राजकीय पक्षाची वा राजकीय संघटनेची स्थापना, संघटन, उभारणी वा नियंत्रण केल्यास तो शिक्षापात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. अशा आरोपीस सात वर्षांपर्यंत सक्तमजुरी वा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा भोगावी लागेल.
बालवाङ्मय म्हणजे वाङ्मयसृष्टीचा पाया
पुणे – बालवाङ्मय हे एक महत्त्वाचे दालन आहे. किंबहुना ते वाङ्मयसृष्टीचा पायाच आहे. म्हणूनच बालवाङ्मयाची जोपासना चांगल्या रीतीने करावयास हवी, असे आवाहन गोपीनाथ तळवलकर यांनी पहिल्या मराठी बाल-कुमार साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना केले.
पोर्तुगालचे नवे पंतप्रधान अझेव्हेडो
लिस्बन – पोर्तुगालचे व्हाइस ऍडमिरल जोस अझेव्हेडो यांनी पंतप्रधान गोन्साल्हेस यांचेकडून पंतप्रधानपद आपल्या हाती घेतले आहे. मंत्रिमंडळाची फेररचना केली असून गोन्साल्हेस हे लष्कर प्रमुख झाले आहेत.