धडपडणाऱ्या मुलांनीच समाज मोठा केला
पुणे, दि. 22 – आपण काही तरी करून दाखवावे या भावनेने भारलेल्या मुलांना उद्देशून साने गुरूजींनी “धडपडणारी मुले’ हा शब्द वापरला. मला हा शब्द फार आवडतो. ज्या समाजात अशी धडपडणारी मुले आहेत तो समाज मोठा होतो. अशी धडपड ही माणसाच्या आयुष्यातील दुसरी शाळा आहे.
पुस्तकात नसलेल्या अनेक गोष्टी माणूस या धडपडीच्या शाळेत शिकत असतो, असे उद्गार उद्योगपती दादासाहेब उर्फ व्ही. व्ही. गोंधळेकर यांनी बोलताना काढले. कुठलेही काम लहान मोठे नसते. काम आपण कोणत्या दृष्टीने करतो, यावर त्या कामाचे सामर्थ्य अवलंबून असते, असेही दादासाहेब गोंधळेकर यावेळी म्हणाले.
मराठी ललित साहित्यावर सेन्सारशिप नको
औरंगाबाद – वृत्तपत्राविरूद्ध सरकारने प्रसिद्धपूर्व नियंत्रण जारी केले तसेच ते ललित साहित्य प्रकाशनांवरही लागू आहे. ते जाचक ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. म्हणून मराठी साहित्य मंडळाने पंतप्रधान इंदिरा गांधींकडे एक विनंती पत्र धाडण्याचे ठरविले असून त्यात अशी मागणी करण्यात येणार आहे की, ललित साहित्याच्या बाबतीत सेन्सॉरशिप रद्द करावी.
वरील निर्णय महामंडळाने आपल्या औरंगाबाद येथे भरलेल्या बैठकीत घेतला आहे. या बैठकीचे अध्यक्षपदी कवी अनिल हे होते. याबाबत पंतप्रधांनाकडून अपेक्षित कृती होणार असल्याचा सकारात्मक विचारही यावेळी मांडण्यात आला. कवी अनिल यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.