हृदयाला व यकृताला कॉफी घातक!
अहमदाबाद, दि. 27 – कॉफीमुळे शरीर निःसत्त्व होते आणि हृदय व यकृत यांच्या कार्यावर दुष्परिणाम होतो असा निष्कर्ष येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील काही डॉक्टरांनी काढला आहे. यासाठी वर्षभर उंदरांवर प्रयोग करण्यात आले. अजून सहा महिने प्रयोग चालणार आहेत व नंतर अंतिम निष्कर्ष काढण्यात येईल.
पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा
नवी दिल्ली – काश्मीरच्या जनतेच्या नावाने पाक सरकारने जागतिक लोकमताची दिशाभूल करू नये, असा इशारा पंतप्रधान इंदिरा गांधींनी आज पाक सरकारला दिला आहे. जम्मू व काश्मीरच्या जनतेने भुट्टोंच्या हरताळाच्या आदेशास पूर्णपणे “हरताळ फासला’ आणि अशा तऱ्हेने काश्मिरी जनतेने पाकला त्याच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याविरुद्ध चांगलाच ठोसा लगावला आहे.
एकोप्याचे रूपांतर प्रेमात व्हावे
मुंबई – मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी असे जाहीर केले की, माझ्या मंत्रिमंडळात एकोपा आहे. या एकोप्याचे रूपांतर प्रेमात व्हावे यासाठी प्रयत्न करीन. चव्हाण पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री नाईक यांनी राज्यात सत्तासंक्रमण ज्या पद्धतीने घडवून आणले त्यामुळे नाईकांचे नाव लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल.