पाकला बॉम्बर विमाने दिल्यास नवी शस्त्रस्पर्धा
वॉशिंग्टन, दि. 23 – अमेरिकेने पाकिस्तानला ए-7 जातीची 110 बॉम्बर विमाने विकण्याचा निर्णय अंमलात आणल्यास भारतीय उपखंडात एका नव्या शस्त्रस्पर्धेला सुरुवात होईल, असे भारताने अमेरिकेला कळविले आहे.
यावर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री डॉ. हेन्री किसिंजर यांनी सांगितले की, या विमानविक्रीबाबत अंतिम निर्णय फोर्ड प्रशासनाने भावी अध्यक्ष कार्टर यांच्यावर सोपविण्याचे ठरविले आहे. पाकिस्तान अण्वस्त्र व्यवहारापासून अलिप्त राहिल्यास त्यास शस्त्रपुरवठा केला जाईल, असे धोरण आहे.
दौलताबादजवळ अभयारण्य होणार
दौलताबाद – इतिहास प्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याजवळ पक्ष्यांसाठी एक अभयारण्य व एक विभागीय उद्यान तयार करण्यात येणार आहे. अभयारण्यासाठी माळीवाडा तलावापासून दौलताबाद तलावापर्यंतचे 1630 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
अंगोला यूनोचा सदस्य होणार
संयुक्त राष्ट्रसंघ – अंगोला हा देश राष्ट्रसंघाचा 146वा सदस्य बनणार आहे. सुरक्षा समितीने यासाठी मंजुरी दिली व शिफारस आमसभेला केली. 15 सदस्यांच्या सुरक्षा समितीत 13 मते अंगोला बाजूने पडली.