परिवर्तनाची जबाबदारी आता कॉंग्रेस पक्षावर!
जालंदर, दि. 4 – सर्वसामान्य जनतेच्या उद्धाराच्या आड येणाऱ्या घटनेतील अडचणी दूर झाल्यानंतर समाजात आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हे कॉंग्रेस पक्षाचे राजकीय इच्छाबळ व कुवत यावर अवलंबून आहे, असे स्वर्णसिंग यांनी म्हटले.
भारत पाकवर व्यापारी करार लादू इच्छित नाही
इस्लामाबाद – भारत पाकिस्तानवर व्यापारी करार लादू इच्छित नाही, असे पाकिस्तानचे भारतातील राजदूत फिदा हुसेन म्हणाले. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मी नुकतीच भेट घेतली तेव्हा गांधी यांनीच वरील मत व्यक्त केले.
सहकार चळवळीत श्रीमंत अधिक श्रीमंत झाले
पुणे – दुर्बल घटकांसाठी सहकार चळवळ आधारभूत व्हावी ही अपेक्षा काही ठिकाणी फोल ठरली असून श्रीमंतानी या चळवळीचा फायदा घेऊन ते अधिक श्रीमंत बनले आहे, असे विचार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
3 हजार वर्षे जुन्या मूर्तीची पुराणवस्तू खात्याकडे नोंद
पुणे – सुमारे 3 हजार वर्षांपूर्वीची म्हणजे लोह उगम काळातील टेराकोटा (पक्व मृदा शिल्प) एका स्त्रीच्या मूर्तीची नोंद पुराण वस्तू नोंदणी खात्याकडे आज करण्यात आली. टेराकोटा पद्धतीच्या इतर 10-12 मूर्तींची नोंदही करण्यात आली.