भारतीय शास्त्रज्ञांच्या साहाय्याची मोठी गरज
वॉशिंग्टन, दि. 3 – भारतात चालू असलेल्या तंत्रज्ञान क्रांतीसाठी तुमचे ज्ञान व अनुभव यांची गरज आहे, असे विदेशमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांपुढे बोलताना सांगितले. ते म्हणाले, याचा अर्थ आम्ही तुम्हाला पळवून नेऊ इच्छितो असा नाही. परंतु भारतीय लोक मग ते कोठेही असोत त्यांना आम्ही विसरू शकत नाही. त्यांनी त्यांना शक्य असेल त्या प्रकारे साहाय्य करावे आम्ही त्या साहाय्याचे स्वागतच करू.
संपर्कासाठी इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर हवा
नवी दिल्ली – राष्ट्रीय एकतेसाठी इंग्रजीऐवजी हिंदी भाषेचा संपर्क भाषा म्हणून वापर व्हावा, अशी मागणी राष्ट्रीय एकता परिषदेत केली.
दारूबंदीचा नुसता प्रचार नको मतपरिवर्तनाचे कार्य हवे
पुणे – दारूबंदीचा प्रचार सप्ताहापुरता करून भागणार नाही, तसेच दारूबंदीची कार्यवाही यशस्वी करावयाची असेल तर केवळ प्रचार करून चालणार नाही, असे प्रतिपादन दिनेश अफझुलपूरकर यांनी दारूबंदी सप्ताहाचे उद्घाटक म्हणून बोलताना केले. दारूबंदीच्या बारा कलमी कार्यक्रमास अनुसरून शासनाने जाहीर केलेले नवीन धोरण स्पष्ट करून या धोरणांची जिल्ह्यात कडकपणे राबवणूक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
कामगारांना शासनाकडे न्याय मागता येईल
पुणे – कामगार व कारखानदार यांना शासन समान न्यायाने वागवत आहे. कामगार थेट शासनाकडे अर्ज करून न्याय मागू शकतात, असे उपमंत्री बाबुराव काळे म्हणाले.