विविधा : पं.पन्नालाल घोष

– माधव विद्वांस

बासरीवादनाला एक स्वतंत्र दर्जा मिळवून देणारे, प्रख्यात बासरीवादक पंडित पन्नालाल घोष यांची आज जयंती. त्यांचा जन्म सध्याच्या बांगलादेशमधील बारिसाल येथे 24 जुलै, 1911 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव “अमल ज्योती घोष’ असे होते. त्यांचे वडील अक्षयकुमार घोष हे उत्तम सतारवादक तसेच प्रख्यात धृपदिये व पखवाज वादक होते.त्यामुळे संगीताचे संस्कार सुरुवातीसच घरापासून झाले होते. पन्नाबाबूंना व्यायामाची खूप आवड होती. ते स्वतः लाठीकाठी, बॉक्‍सिंग व मार्शल आर्टच्या खेळाडूंना प्रशिक्षण द्यायचे.

वयाच्या चौदाव्या वर्षीच पन्नालाल बासरीकडे आकृष्ट झाले. त्यांनी मास्टर खुशी महम्मद या संगीतकाराचे शिष्यत्व पत्करले. त्यानंतर “सराईकेला नृत्यमंडळी’त त्यांनी काही काळ संगीत दिग्दर्शन केले. या मंडळींबरोबरच वर्ष 1938 मध्ये त्यांनी यूरोप दौरा केला. वर्ष 1939 मध्ये गिरीजा शंकर चक्रवर्ती यांच्याकडे आणि नंतर 1947 च्या सुमारास उस्ताद अल्लाउद्दीनखॉं यांच्याकडे त्यांनी संगीताचे अधिक शिक्षण घेतले.पंडितजी वर्ष 1940 मध्ये मुंबई येथे वास्तव्यास राहिले. त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये संगीत दिग्दर्शक आणि बासरीवादनाचे काम केले. चित्रपट क्षेत्रात ते 1940 ते 1944 या काळात संगीत दिग्दर्शक म्हणून होते व पुढेही तेथेच 1956 पर्यंत बासरीवादक होते. वर्ष 1940 मध्ये पन्नालाल यांनी संगीत दिग्दर्शक अनिल बिश्‍वास यांची बहीण आणि सुप्रसिद्ध पार्श्‍वगायिका पारूल घोष यांच्याशी विवाह केला. कवी प्रदीप यांचे “ऐ बादे समा इठलाती न आ’ हे गीत “हमारी बात’ या चित्रपटासाठी अनिल बिश्‍वास यांनी पारूल घोषकडून गाऊन घेतले होते.

या काळात त्यांनी बासरीवादनाचे स्वतंत्र कार्यक्रमही केले. वर्ष 1956 मध्ये ते दिल्लीला आले. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात 1956 पासून त्यांनी वाद्यवृंद निर्देशक म्हणून जबाबदारी पार पाडली. भारतीय बासरीवादनाच्या क्षेत्रातील एक युगप्रवर्तक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. वेणुवादन हे श्रीकृष्णामुळे महाभारत काळापासून भारतातील संगीताचा साथीदार आहे. भारतातील पौराणिक तसेच ऐतिहासिक जुन्या ग्रंथांमध्ये वेणू, वंशी, पावरी, मुरली किंवा फिल्लगोरी या नावांनी बासरीचा उल्लेख आढळून येतो.

या बासरीला शास्त्रीय बैठक देऊन त्यांनी तिला जागतिकस्तरावर पोहोचविले. ख्याल गायनातील आलापासारखे विलंबित संगीतविस्तार तसेच सतार, सरोद इ. तंतुवाद्यातील “झाला’सारखे वादनप्रकार त्यांनी बासरीवादनात अंतर्भूत केले. यासाठी त्यांनी संशोधन करून मोठ्या व्यासाची, अधिक लांबीची बासरी 40-42 इंचापर्यंत वाढविली व परिणामतः अधिक स्वरक्षेत्राची बासरी तयार केली. बासरी उभी किंवा आडवी धरून वाजविली जाते पंडितजी बासरी आडवी धरून वाजवीत असत. त्यांनी तयार केलेली बासरी वाजविण्यासाठी मोठा श्‍वास व ताकद गरजेची असते. लहानपणी त्यांनी व्यायाम करून शरीर बलदंड केले होते त्यामुळे ते सहजतेने बासरीला सूर लावीत.

अर्ध, पाव इ.स्वरांतरे आणि मींडकाम सारखे संगीतालंकार त्यांनी बासरीवादनातून यशस्वी करून दाखविले. त्याबरोबर संगीत दिग्दर्शक आणि रचनाकार म्हणूनही त्यांनी कीर्ती मिळविली. त्यांनी केलेल्या इंतजार, बसंत ह्या चित्रपटांच्या संगीतरचना व “आशा’, “बागेश्री’, “ऋतुराज’, कलिंगविजय’, “भैरवी’, “ज्योतिर्मय अमिताभ’ इ. वाद्यवृंदरचना सर्वश्रुत आहेत. त्यांनी हरिप्रसाद चौधरी, देवेंद्र मुर्डेश्‍वर, बेडा देसाई इ. प्रसिद्ध बासरीवादकांना धडे दिले. 20 एप्रिल 1960 रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.