भक्‍ती : जातो माघारी पंढरीनाथा…!

-मिलन म्हेत्रे

प्रपंची असून परमार्थ साधावा ।
वाचे आठवावा पांडुरंग ।।
उच्च-नीच काही न पाहे सर्वथा ।
पुराणींच्या कथा पुराणींच ।।
घटका आणि पळ साधी उतावीळ ।
वाउगा तो काळ जाऊं नेदी ।।
सावता म्हणे कांते, जपे नामावळी ।
हृदयकमळीं पांडुरंग ।।
 – संत सावतामाळी

संतांच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या हृदयावर कमळरूपाने पांडुरंगाचे- त्या पंढरीच्या विठ्ठलाचे अधिराज्य आहे. म्हणूनच केवळ अवघा महाराष्ट्र देहू-आळंदीमधून एका विशिष्ट ओढीने त्या विठ्ठलाच्या दर्शनाला अक्षरशः धावत असतो. पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला निघालेला हा वैष्णवांचा मेळा आषाढी दशमीला पंढरीत पोहोचतो, माऊली-तुकोबांच्या भेटीला स्वतः नामदेव महाराज पंढरीच्या वेशीवर येतात आणि पंढरपूरची ग्रामप्रदक्षिणा होऊन हा मेळा पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटी विसावतो.

आषाढी एकादशीला लाखो वैष्णवांच्या या मेळ्याला पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन होवो न होवो, ती पंढरीची माती बुक्‍क्‍याप्रमाणे कपाळी लावून आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन हा सोहळा देहू-आळंदीकडे परत फिरतो. या सोहळ्यात परत येताना गुरूपौर्णिमेला पंढरीची ग्रामप्रदक्षिणा होते, पांडुरंगाच्या नामघोषात माऊली-तुकोबांच्या पादुका पांडुरंगाच्या दर्शनाला मंदिरात जातात, काल्याचे कीर्तन होते, तिथे आरती-नैवेद्य होतो आणि पालख्या वाखरीकडे प्रस्थान ठेवतात.

अवघ्या दहा दिवसांत पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. खरे तर आठच दिवसांत पालख्या परत येतात. या पालख्यांचा पुण्यात दोन दिवस परतीचा मुक्‍काम असतो. माऊलींची तुकोबांची पालखी आषाढ व एकादशीला देहू-आळंदीला पोहोचते.
आषाढी एकादशी झाली की असंख्य वारकरी “जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ असे म्हणत पांडुरंगाचा निरोप घेतात आणि आपापल्या गावी परतात; पण माऊली-तुकोबा पुन्हा देहू-आळंदीत जात नाहीत, तोपर्यंत वारी सोहळ्याची सांगता होत नाही, असे मानणारे अनेक वारकरी आहेत आणि ते पुन्हा देहू-आळंदीत माऊली-तुकोबांच्या पालख्यांबरोबर येतात.

‘परतवारी’ या सुधीर महाबळ यांच्या पुस्तकात या परतवारीला “वैराग्यवारी’ असे म्हटले आहे. आसक्‍तीकडून वैराग्याकडे-आध्यात्मिक जीवनाकडे नेणारी ही वारी… पंढरीला जाताना 20-22 कि. मी. अंतर कापणाऱ्या या पालख्या परत येताना रोज 35-40 कि. मी. अंतर पायी कापतात. मात्र, पांडुरंगाच्या चैतन्यमय दर्शनाची ऊर्जा वारकऱ्यांमध्ये उर्मी जागृत करते आणि वारीच्या सोहळ्याला एक आध्यात्मिक वलय प्राप्त होते.

पहाटे दोन वाजता पांडुरंग-माऊली-तुकोबांची आरती करून चालायला सुरुवात करायची, या पालख्यांच्या रथाला असलेल्या दिव्यांच्या प्रकाशात सूर्य उगवायच्या आत विसाव्याच्या ठिकाणापर्यंत अंतर कापायचे. विसाव्याचे टप्पे ठरलेले असतात. या पालख्यांचा मुक्‍काम मंदिरात किंवा शाळांमध्ये असतो. वारीच्या अग्रभागी असलेले मानाचे अश्‍व वाखरीपर्यंत येतात आणि माऊलींचे अश्‍व अंकलीला आणि तुकोबांचे अश्‍व अकलूजला परत जातात. अर्थातच या परतवारीत रिंगण हा प्रकारही नसतो.

पालख्या पुण्यात येतात तेव्हा या पालख्यांबरोबर हजार-दीड हजार लोक असतात, मात्र, पुढे देहू-आळंदीकडे जाताना या वारकऱ्यांची संख्या वाढते आणि सात-आठ हजार होते, तर आळंदी-देहूत वारीच्या समाप्ती सोहळ्यासाठी सुमारे पंधरा-वीस हजार वारकऱ्यांची मांदियाळी जमलेली असते. दिंड्यांचा-वैष्णवांचा सोहळा पुन्हा एकदा फुलतो.

आळंदीला थोरल्या पादुका चौकात पालखीला ग्रामस्थ सामोरे जातात, तर देहूला चिंचवलीला सामोरे जातात. तिथून पालख्या नामघोषात गावांत नेल्या जातात. आळंदीला थोरल्या पादुका चौकात चोपदार चक्रांकित महाराजांना पालखी परत आल्याची “खबर’ देतात आणि चक्रांकित महाराजांची दिंडी पालखीला सामोरी जाते. आळंदीत विष्णू-राम-हरिहरेंद्र मठात पालखीची आरती होते. रात्री तिथेच मुक्‍काम होतो. हजेरी मारुती मंदिरात आणि देहूतही दिंडीतील विणेकऱ्यांना मानाचा नारळ दिला जातो, आरती होते आणि सोहळ्याची समाप्ती होते.

वारीचे वर्णन करताना डॉ. रामचंद्र देखणे यांनी त्यांच्या एका लेखात म्हटले आहे की, वारी म्हणजे शुद्धतेकडे नेणारा प्रवाह आहे. वारी ही द्वैतभावाची वाटचाल आहे, अद्वैतभावाचा मुक्‍काम आहे आणि प्रेमभावाचा विसावा आहे. ज्ञानपीठाकडून प्रेमपीठाचा महायोगपीठाकडे असा हा प्रवास आहे. हा पायी प्रवास एक महाप्रदक्षिणा आहे, संतांनी पांडुरंगाला घातलेली आणि नंतर तोच वसा वारकऱ्यांनी घेतल्याची… देहू-आळंदी-पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर-देहू-आळंदी. ही महाप्रदक्षिणा चैतन्याची, प्रेमभक्‍तीची, द्वैता-अद्वैतापलीकडची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)