संडे स्पेशल : वारीचा सुखसोहळा

-अशोक सुतार

आषाढ महिना सुरू झाला आहे. वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. पंढरीला जायचं, मायबाप विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घ्यायचं हेच ध्येय वारकऱ्यांसमोर आहे. संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकोबा महाराजांनी दाखवलेल्या भागवत धर्माच्या मार्गाने वारकऱ्यांना जायचे आहे. वारी केली म्हणजे पंढरीला गेलो असे नव्हे तर हृदयमंदिरातील विठूशी एकरूप म्हणजे दत्त व्हावे लागेल.

दरवर्षीप्रमाणे यंदाची वारी चुकवायची नाही असे आबांनी ठरवले आहे. त्यांना लहानपणीचे दिवस आठवतात. नाना म्हणजे आबांचे वडील लहानग्या महादूला म्हणजे आबांना खांद्यावर घेऊन पंढरीची वारी करीत, कधी वारीत चालवत नेत. नाना म्हणायचे, महादू लहान आहे पण पुढे पंढरीची वारी सुरू ठेवील.

पूर्वीची माणसं निश्‍चयी मनाची होती. सर्व काही करायचे ते मन लावून, शांत चित्ताने. त्यामुळे संसार करताना परमार्थ साधला जात होता. आता हेच पाहा ना, वारीला जायचे म्हणजे आबांच्या सौभाग्यवतीची अस्वस्थता वाढली आहे. आबांना दोन मुले आणि एक मुलगी. तिघांचे लग्न झालेले. संसाराचा भार दोन मुलांवर टाकून आबा आणि हौसाबाई निशिंचत झाले होते. तरीही आपल्या पत्नीचे मन संसारात अडकून राहावे हे आबांना पटत नाही.

आबा म्हणतात, “”हौसाबाई, काळजी करू नका. माझ्या पांडुरंगाला सगळी काळजी हाय. निम्मा जीव घरात आणि निम्मा पंढरपुराच्या वारीत हे बरं नाही.” संसारात राहून अशी स्थिती झाली तर परमार्थ साधणार कधी? चिंता मिटली, अस्वस्थता संपली की चित्ती समाधान नांदते. चित्ती समाधान असले की संसारातील कामे करताना विठुरायाचे दर्शन होते. याची देही, याची जन्मी परमार्थ साधला जातो. म्हणून संतांनी आपल्याला भागवत धर्माची वाट दाखवली आहे.

वारकरी उत्साहाने वारीला निघतात, मनाला विठुरायाची ओढ लागलेली असते. विठ्ठल मात्र सदा सर्वत्र विहरत आहे. तो कुठे नाही? भुकेल्या, रंजल्या-गांजल्याची काळजी करीत तो विटेवर युगानुयुगे उभा आहे. वारी ज्याला समजली, त्याच्या मनातील भेदभाव संपला. संत तुकाराम म्हणाले आहेत की, जे का रंजले, गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा. देव म्हणजे विठुराया रंजल्या-गांजल्या लोकांत आहे, त्यांना मदत केली तर विठुरायाचे दर्शन झाल्यासारखेच आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी 13 व्या शतकात सर्वधर्मसमभाव अंतर्भूत असलेल्या भागवत धर्माचा पाया घातला आणि संत तुकारामांनी 17 व्या शतकात त्यावर सोन्याचा कळस चढवला.

पंढरी चालली वारी, विठू भेटला अंतरी, एक झाले चित्त, विठू आला माझ्या दारी. विठुरायाच्या भक्‍तीत एवढी ताकद आहे! वारीमध्ये नाही भेदभाव, नुरे अहंकार. वारी शिकवी आध्यात्म. वारकरी पंढरीच्या वारीत देहभान हरपून टाळ-मृदंगाच्या तालावर विठोबा-रखुमाईचा गजर करतात. वारीचा सुखसोहळा ज्याने अनुभवला तो धन्य होय.

वारी म्हणजे आध्यात्म सुखाचा सोहळा, जिथे सर्व विद्यार्थी आहेत. विद्यार्थी असल्याची भावना असेल तर नवीन जीवनमूल्ये शिकता येतात. विठूच्या दरबारात नाही कोणी परका, जाती-भेदाच्या वाऱ्याला तर थाराच नाही.

विठूच्या दर्शनाने वारकरी सर्व चिंता विसरून जातो. विठ्ठल-रखुमाई कंबरेवर हात ठेवून वारकऱ्यांकडे हर्षभऱ्या नजरेने, ममतेने पाहतात. वारकरी डोळे भरून मायबापाचे दर्शन घेतात. त्यावेळी ब्रह्मांडात वारकरी, विठ्ठल-रखुमाई यांचेच अस्तित्व असते. तो सुखसोहळा अत्युच्च कोटीचा असतो, त्यासारखा परमानंद नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.