-अमोल पवार
अमेरिकेच्या हवाई प्रांतातून 2012 पासून विक्रमी मतांनी निवडून येणाऱ्या तुलसी गेबार्ड या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीच्या प्रबळ दावेदार होत्या. नावावरून त्या मूळ भारतीय वंशाच्या वाटत असल्या तरी त्या जन्माने हिंदू नाहीत. त्यांचे वडील कॅथॉलिक धर्माचे अनुसरण करतात तर आईने हिंदू धर्म स्वीकारला आहे.
“सध्याच्या काळाशी झुंज देण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा श्रीमद्भगवद्गीतेत आहे. यामुळेच व्यक्तीला शाश्वती, शक्ती आणि शांती मिळू शकते. भगवान श्रीकृष्णाने शिकविलेल्या कर्मयोग आणि भक्तियोगाच्या मार्गाचे अनुसरण करूEन या गोष्टी मिळवू शकतो.” हे उद्गार आहेत अमेरिकी कॉंग्रेसच्या हिंदू सदस्य तुलसी गेबार्ड यांचे. आफ्रिकी वंशाच्या फ्लॉइड नामक व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत उसळलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुलसी यांनी नुकतेच हे ऑनलाइन निवेदन केले. तुलसी गेबार्ड या अमेरिकी कॉंग्रेसमधील एकमेव हिंदू सदस्य आहेत. अमेरिकी कॉंग्रेसमध्ये त्यांनी गीता हातात घेऊन शपथ घेतली होती, त्याच वेळी त्या चर्चेत आल्या होत्या. त्या मूळ भारतीय वंशाच्याही नाहीत आणि जन्माने हिंदूही नाहीत. आईकडून मिळालेल्या संस्कारांनंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला.
सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तुलसी यांचे नाव चर्चेत होते. अर्थात, आपल्या पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार नाही, असे तुलसी यांनी स्पष्ट केले होते. अमेरिकेतील यहुदींच्या खालोखाल संख्येने असणाऱ्या हिंदूंमध्ये तुलसी खूप लोकप्रिय आहेत. हिंदू समाजाचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या कट्टर विरोधक आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्यासमवेत “हाउडी मोदी” कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हाही तुलसी यांनी त्यात भाग घेतला नव्हता. अर्थात, मोदी यांच्या त्या समर्थक आहेत. नंतर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीशी संबंधित कार्यक्रमाचे कारण देऊन पंतप्रधानांना “सॉरी” ही म्हटले होते. हवाई या राज्यातून नेहमी विक्रमी मताधिक्याने विजयी होणाऱ्या तुलसी या राजकारणात येण्यापूर्वी लष्करात होत्या आणि मेजर पदावर त्यांनी काम केले.इराकमध्येही त्यांची बारा महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती. अमेरिकी प्रतिनिधी मंडळात त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्य असून 2013 पासून सलग खासदार आहेत.
तुलसी या मूळ भारतीय वंशाच्या असाव्यात, असा कयास लावला जात होता. मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांमध्ये त्या बऱ्याच लोकप्रिय आहेत. नरेंद्र मोदी यांच्या त्या कट्टर समर्थक मानल्या जातात. 2014 मध्ये त्यांनी अनेक मंचांवरून ही बाब जाहीरपणे सांगितली आहे. त्यांनी मोदींना आपल्याजवळील भगवद्गीता भेटही दिली होती. मोदी यांना 2002 मध्ये अमेरिकेचा व्हिसा नाकारण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला होता. त्याचप्रमाणे देवयानी खोब्रागडे या भारतीय अधिकारी महिलेस झालेल्या अटकेलाही त्यांनी प्रखर विरोध केला होता. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर असलेल्या संबंधांचा अमेरिकेने फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी संसदेत केली होती.
हिंदू परंपरांशी जोडल्या गेलेल्या तुलसी या शुद्ध शाकाहारी आहेत. चैतन्य महाप्रभूंच्या गौडीय वैष्णव संप्रदाय या आध्यात्मिक आंदोलनाच्या त्या पाईक आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे भाऊबहीणसुद्धा हिंदूच आहेत. भक्ती, जय, नारायण आणि वृंदावन अशी त्यांची नावे आहेत. श्रीमद्भगवद्गीता आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन करते, असे त्या मानतात. कर्मयोग सिद्धांतावर त्यांची अपार श्रद्धा आहे. भारतात येण्यासाठी त्या उत्सुक आहेत. विशेषतः वृंदावन येथे त्यांना जावेसे वाटते. तुलसी यांनी 2015 मध्ये अब्राहम विल्यम यांच्याशी वैदिक रीतिरिवाजांनुसार लग्न केले. अमेरिकेतील समाओ द्वीपसमूहामधील लेलोआ लोआ येथील एका राजकीय कुटुंबात 12 एप्रिल 1981 मध्ये त्यांचा जन्म झाला. तुलसी यांचे पिता माइक गेबार्ड हे हवाई द्वीपसमूहाच्या राजकारणातील मोठे नाव मानले जाते. तुलसी यांच्या मातोश्री कॅरोल पोर्टर यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला. तुलसी एक वर्षाच्या असताना त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले.
संमिश्र धार्मिक वातावरणात तुलसी यांचे संगोपन झाले. कारण त्यांचे पिता कॅथॉलिक धर्म मानणारे आहेत तर आई मात्र हिंदू धर्माची अनुयायी आहे. त्यांच्या वडिलांनी हिंदू पद्धतीने पूजाअर्चा करण्यास अजिबात विरोध केला नाही. तुलसी यांनी किशोरावस्थेत असतानाच हिंदू धर्माचा स्वीकार केला. त्यांनी प्राथमिक शिक्षण आपल्या घरीच घेतले. कालांतराने 2009 मध्ये त्यांनी हवाई पॅसिफिक युनिव्हर्सिटीतून व्यवसाय व्यवस्थापनात पदवी संपादन केली. त्यानंतर सोळा वर्षे लष्करात सेवा बजावली. 2006 मध्ये इराकसारख्या अशांत देशात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
6 नोव्हेंबर 2012 रोजी तुलसी अमेरिकी प्रतिनिधी सभेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार म्हणून सर्वप्रथम निवडून आल्या. त्यांच्या मतदारसंघातून त्यांना तेव्हापासूनच विक्रमी मते मिळतात.
भारत आणि अमेरिकेदरम्यान मजबूत संबंध असावेत, या मताच्या त्या पुरस्कर्त्या आहेत; परंतु आजकाल राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध पद्धतशीर मोहीम चालविली जात आहे. त्यांना “हिंदू राष्ट्रवादी’ असे संबोधले जात आहे. परंतु त्या अत्यंत मोकळ्या शब्दांत या आरोपाचे खंडन करतात. बिगरहिंदू नेत्यांना सवाल न विचारणे आणि त्यांच्या निष्ठेविषयी प्रश्न उपस्थित करणे, हा दुहेरी निकष कशासाठी, असा सवाल त्या विचारतात. आपले समर्थक आणि देणगीदार यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेवर त्यांनी प्रखर टीका केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी पहिली हिंदू अमेरिकन दावेदार असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे त्या सांगतात.