चर्चेत : तमिळनाडूतील ‘राजकीय खिचडी’

-केतकी शुक्‍ल, चेन्नई

जयललिता आणि करुणानिधी यांच्या अनुपस्थितीत प्रथमच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत यावेळी तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्याव्यतिरिक्‍त अनेक पक्ष रिंगणात आहेत. त्यामुळेच अण्णा द्रमुकच्या विरोधात वातावरण असले, तरी त्याचा लाभ द्रमुकला मिळण्याची शक्‍यता दिसत नाही. मतदारांसमोर यावेळी पर्यायही अधिक आहेत. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यापासून दुरावलेली मते एकमेकांना मिळण्याची यावेळी फारशी शक्‍यता नसून, अनेक नवे पर्याय उपलब्ध झाल्याने तमिळनाडूचा रणसंग्राम रोचक ठरणार आहे.

भारताच्या राजकारणात कॉंग्रेस आणि भाजप हे दोन प्रमुख मोठे पक्ष मानले जात असले, तरी जेव्हा तमिळनाडूची चर्चा होते, तेव्हा हे दोन्ही प्रमुख पक्ष स्थानिक द्रविडी पक्षांच्या म्हणजेच द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षांच्या आधारावरच उभे राहिलेले दिसतात. जयललिता आणि करुणानिधी या दिग्गज नेत्यांच्या उदयाच्या काळापासून आजतागायत हेच सूत्र राहिल्याचे आपल्याला आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या आघाड्यांमधूनही दिसून येते. राज्यात दोन मोठ्या आघाड्यांची स्थापना झाली आहे. यातील एका आघाडीचे नेतृत्व द्रमुक तर दुसऱ्या आघाडीचे नेतृत्व अण्णा द्रमुक करीत आहे. तमिळनाडूतील 39 आणि शेजारीच असलेल्या पुड्डूचेरीमधील एक अशा एकंदर 40 जागांपैकी अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोघांनीही आपापल्या पक्षाकडे 20-20 जागा ठेवल्या असून, उर्वरित जागा आपापल्या आघाडीतील घटकपक्षांसाठी सोडल्या आहेत.

अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत रामदौस यांच्या पीएमकेला सात जागा देण्यात आल्या आहेत. यात राज्यसभेच्या एका जागेचा वायदा करण्यात आला आहे. पाच जागा भाजपला देण्यात आल्या आहेत. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके या पक्षासाठी चार जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. माजी कॉंग्रेस नेते जी. के. वासन यांचा टीएमसी, डॉ. कृष्णासामी यांचा पीटी, ए. सी. षण्मुगम यांचा एनजेपी आणि पुड्डूचेरीमध्ये एन. आर. कॉंग्रेस असे अन्य छोटे पक्ष प्रत्येकी एकेक जागा लढवीत आहेत. दुसरीकडे द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीतून कॉंग्रेस दहा जागा लढवीत आहे. विदुथलई चिरुथइगल काची, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट हे पक्ष प्रत्येकी दोन जागा लढवीत आहेत. याखेरीज वायको यांचा एमडीएमके, आयजेके, आययूएमएल आणि केडीएमके या चार पक्षांना प्रत्येकी एकेक जागा देण्यात आली आहे. एमडीएमके पक्षाला द्रमुकने राज्यसभेची जागाही देण्याचे मान्य केले आहे.

महत्त्वाची बाब अशी की, लोकसभा निवडणुकीबरोबरच तमिळनाडूत एक “मिनी विधानसभा निवडणूक’ होत आहे. म्हणजेच, 18 एप्रिलला लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभेच्या 18 जागांसाठी पोटनिवडणूकही होत असून, राज्यात असे प्रथमच घडत आहे. अण्णा द्रमुकला राज्यातील सत्ता राखण्यासाठी आणि द्रमुकला आठ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर अण्णा द्रमुकला सत्तेपासून दूर करण्यासाठी यातील अधिकाधिक जागा जिंकणे गरजेचे आहे. पूर्वीप्रमाणेच ही लढाई मुख्यत्वे द्रमुक आणि अण्णा द्रमुक याच पक्षांमध्ये होणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, दोन नवे चेहरे आपापल्या पक्षासह या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच रिंगणात उतरले आहेत. यातील एक पक्ष आहे दिनाकरन यांचा एएमएमके तर दुसरा आहे अभिनेते कमल हासन यांचा एमएनएम.

हे दोन्ही पक्ष द्रमुक किंवा अण्णा द्रमुक आणि या दोन्ही आघाड्यांमधील मित्रपक्षांच्या मतांमध्येच वाटा मिळवणार हे उघड आहे. याखेरीज या निवडणुकीत चित्रपट निर्माते सीमान यांचा तमीझर काची हाही पक्ष उतरला आहे. राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतपेढ्या सुरक्षित राहतील. परंतु तटस्थ आणि नव्या मतदारांचा कौल महत्त्वाचा राहील आणि हे युवा मतदारच या पक्षांचे भवितव्य ठरवतील. कमल हासन, दिनाकरन किंवा सीमान यांना मते देऊन हेच युवा मतदार द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांच्या भवितव्याचा खरा फैसला करतील, असा अंदाज आहे. काही विश्‍लेषकांचे म्हणणे असे आहे की, मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या या अण्णा द्रमुकमधील सध्याच्या नेतृत्वावर नाराज असलेल्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात दिनाकरन यशस्वी होऊ शकतात. कमल हासन यांनी युवक, महिला आणि प्रथमच मतदान करणाऱ्यांशी भावनिक नाते प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे तमिळ मानसिकता असलेल्या युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात सीमान यांनाही बऱ्याच प्रमाणात यश येऊ शकते. आतापर्यंत मतदारांना द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या व्यतिरिक्‍त फारसे पर्याय उपलब्ध नव्हते; परंतु आता त्यांच्यासमोर अनेक आकर्षक पर्याय आहेत.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना भुईसपाट करणारा द्रमुक आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एकट्याच्या बळावर 37 जागा जिंकणारा अण्णा द्रमुक या दोन पक्षांपैकी एकाही पक्षाची सध्या तमिळनाडूत लाट दिसत नाही. त्यामुळे यावेळी मतांची विभागणी होणे अटळ आहे. या विभागणीत दिनाकरन, सीमान आणि कमल हासन यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. कदाचित यांपैकी कुणीही जिंकणार नाही; परंतु इतर पक्षांचे नुकसान करण्याइतपत या पक्षांचा बोलबाला नक्‍कीच आहे. या पक्षांची अडचण द्रमुक आणि अण्णा द्रमुकला स्पष्टपणे जाणवेल. म्हणजेच, सत्ताधारी अण्णा द्रमुक किंवा भाजप यांच्याविषयी नाराजी असलेल्यांची मते द्रमुकला मिळतील, असे यावेळी खात्रीने सांगता येत नाही. ही मते दिनाकरन आणि कमल हासन यांच्यात विभागली जाऊ शकतात. त्यामुळे नाराजीचा लाभ द्रमुकला मिळण्याची शक्‍यता कमी आहे. याउलट मतविभागणीचा फायदा अण्णा द्रमुकलाच होण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे द्रमुक आणि कॉंग्रेसविषयी नाराज असणाऱ्यांची मतेही अण्णा द्रमुकलाच मिळतील, असे नाही, ही मते एएमएमके आणि एमएनएम या पक्षांकडे वळू शकतात.

काही जनमत चाचण्यांनी द्रमुक-कॉंग्रेस आघाडीला अधिक जागा मिळतील अशी भविष्यवाणी केली असून, काही सर्वेक्षणे अण्णा द्रमुक-भाजप आघाडीला अधिक जागा मिळतील, असे सांगतात. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये आशा कायम आहे. गेल्या आठवडाभरापेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री पलानीस्वामी राज्याचा दौरा करीत आहेत. ते म्हणतात, कॉंग्रेस आणि द्रमुक हे भ्रष्ट पक्ष आहेत तर अण्णा द्रमुक आणि भाजप हे लोकांची सेवा करणारे पक्ष आहेत. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि तेच पुन्हा सत्तेवर येतील. दुसरीकडे द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढताना म्हणतात, तमिळनाडूची जनता कधीही जातीयवादी पक्षांसोबत राहिलेली नाही. आमच्या धर्मनिरपेक्ष आघाडीलाच लोक मतदान करतील. द्रमुक आणि अण्णा द्रमुकला सक्षम पर्याय आपण उभा केला आहे, असा कमल हासन यांचा दावा आहे. या दोन्ही पक्षांनी प्रदीर्घ काळ राज्यात सत्तेवर राहूनसुद्धा राज्यासाठी काहीही केलेले नाही; परंतु आम्ही आमची आश्‍वासने पूर्ण करू, याबाबत जनतेला खात्री आहे, असे हासन यांचे म्हणणे आहे.

आगामी काळात तमिळनाडूच्या निवडणूक मैदानातील तापमान सातत्याने वाढत जाणार आहे. अनेक पक्षांची लढत असणारी ही निवडणूक असल्यामुळे रंगत वाढली आहे. पन्नीरसेल्वम, पलानीस्वामी, स्टॅलिन या नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. ही मंडळी आपापल्या पक्षातील लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या नेत्यांच्या अनुपस्थितीत प्रथमच निवडणूक मैदानात आहेत. याखेरीज कमल हासन, सीमान, दिनाकरन आदी मंडळींचे नेतृत्व कितपत प्रभावी ठरू शकते, याचाही निर्णय ही निवडणूक देणार आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या रणक्षेत्राकडे यंदा संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.