जीवनगाणे : संकटांना सामोरे जाताना…

-अरुण गोखले

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. माणसाला अनुभवातून जे ज्ञान मिळते ते ज्ञान त्याला पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप आणि कितीतरी पटीने जास्त शिकवून जाते. या संदर्भात स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनातला स्वत:चा एक अनुभव सांगून ठेवला आहे.

ते सांगतात, मी बनारसला असतानाची ही गोष्ट. मी असाच गावोगावची भटकंती करत असताना एकदा मला एका जंगलाच्या वाटेतून जाण्याची वेळ आली. मी आपला माझ्याच विचाराच्या तंद्रीत वाट चालत असताना अचानक काही लाल तोंडाची मोठी मोठी खूप माकडे माझ्या दिशेने येताना मी पाहिली. त्यांना माझ्याच दिशेने दात विचकित पुढे येताना पाहून, तसेच त्यांचे ते भयानक चेहरे पाहून मला स्वाभाविकपणे भीती वाटू लागली.

आता नेमके काय करायचे? त्या वाटेवर मी तर एकटाच. सोबतीला आणखी कोणीच नाही. मी एकटा तर ती माकडे मात्र संख्येने अनेक. त्यांनी एकदम आपल्यावर हल्ला केला तर! काय करायचे? स्वत:ची सुटका कशी करायची, या अचानक समोर आलेल्या संकटातून कसे बाहेर पडायचे? बरं माझ्याकडे हातातल्या एका छोट्याशा काठीशिवाय अन्य कोणतेही हत्यार नव्हते.

त्यामुळे मी त्या माकडांना पाहून सरळ जीव मुठीत घेऊन पळायला लागलो. मला पळताना पाहून त्या माकडांनी माझ्या मागे धावत यायला सुरुवात केली. आता काय करायचे? मला निदान त्यावेळी तरी काय करावे हे सुचेना, मार्ग दिसेना, मी घाबरलो, गोंधळलो.

तेवढ्यात माझ्या कानावर आवाज आला. दुरूनच एक साधू मला मोठ्याने सल्ला देऊन सांगत होता की “”घाबरू नकोस. धीर दाखव, असा त्यांना घाबरून न पळता तू धैर्याने मागे फिर. त्यांना पाठ दाखवू नकोस. सामोरा जा… ”
ते शब्द ऐकले, तो सल्ला ऐकला खरा पण… नेमकं करायच काय? आता माझ्या पुढे फक्‍त दोनच मार्ग होते. एक पळपुटेपणाचा आणि दुसरा त्या साधूच्या सल्ल्याप्रमाणे धैर्याने संकटाला सामोरं जाण्याचा.

अखेर मी सारा धीर एकवटला आणि त्या साधूच्या वचनाप्रमाणे मी माझा पवित्रा बदलला. मी झटकन धिराने मागे वळलो. माझ्या हातातली काठी उगारली आणि त्यांच्याकडे पाहू लागलो. तो काय आश्‍चर्य! ज्या माकडांना मी घाबरत होतो, तीच माकडे आता मला घाबरून दूर पळून गेली आणि मीसुद्धा भयमुक्‍त झालो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.