अबाऊट टर्न : बियाणं

-हिमांशू

“कावळ्याचं घर शेणाचं आणि चिमणीचं घर मेणाचं’, हे ऐकण्यात आपलं बालपण गेलं. गोष्टीत धो-धो पाऊस येतो आणि कावळ्याचं घर वाहून जातं. चिमणीचं मेणाचं घर मात्र शाबूत राहतं. या पार्श्‍वभूमीवर, मेणाच्या घरापेक्षा शेणाचं घर अधिक सेफ असतं, असे सांगितले तर आपल्याला पटणारसुद्धा नाही. पण तसे घडलंय खरं! “बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत’ या काव्यपंक्‍तीपुढे “आणि सुरक्षित राहतं मातीच्याच घरात’ ही ओळ जोडावी, अशी ही घटना घडली नगर जिल्ह्यात.

“बीजमाता’ म्हणून नावारूपाला आलेल्या राहीबाई पोपरे यांनी वर्षानुवर्षे कष्ट करून राखलेलं देशी बियाणं अखेर मातीच्याच घरात सुरक्षित राहिलं. अकोले तालुक्‍यातील कोंभाळणे गावच्या राहीबाईंनी अनेक प्रकारच्या देशी वाणांचे जतन केलेले असून, माध्यमांनी आणि सामाजिक काम करणाऱ्या संस्थांनी त्यांची दखल घेतली.

अनेक वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहिलेले त्यांचे काम उजेडात आले आणि देशी वाणाचे महत्त्व, गुणधर्म, संग्रहणाची पद्धती, उपयोग अशी माहिती घेण्यासाठी हायब्रीड खाणाऱ्यांची रीघ लागली. बियाणांची एक बॅंकच राहीबाईंकडे आहे आणि दूरदूरचे लोक ही बॅंक बघायला येतात. अशा प्रयत्नवादी व्यक्‍तींकडे सरकारचे लक्ष कधीच जात नाही. विमान बनवणाऱ्या मराठी उद्योजकालाही हाच अनुभव आला आणि ऐन “मेक इन इंडिया’च्या मोसमातही तोच अनुभव टिकून राहिला. पण राहिबाईंचा अनुभव वेगळाच!

बियाणांचे जतन करण्याचे काम सोपे नसते. एखाद्या व्रतासारखे ते दीर्घकाळ जोपासावे लागते, हे शेतीशी दुरान्वये संबंध नसलेल्या आमच्यासारख्यांना माध्यमांमुळेच कळले. आमची रविवारची सकाळ मंडईत देशी गवार शोधण्यात जाते; पण ती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मुख्य स्रोत जपणं किती अवघड असते, हे राहीबाईंमुळे कळले. सरकारने राहीबाईंच्या कामाची दखल घ्यायचे ठरवले, याचा सगळ्यांनाच आनंद झाला. बीज बॅंकेसाठी एक खोली आणि लोकांना माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र दालन राहीबाईंना बांधून द्यायचे सरकारने ठरवले.

काही महिन्यांपूर्वीच बांधकाम पूर्ण झाले आणि बियाण्यांच्या बॅंकेचे झोकात स्थलांतर झाले. परंतु सरकारी बांधकामाचे “बियाणं’सुद्धा जुने, वर्षानुवर्षे जतन केलेले होते, हे पहिल्याच पावसात स्पष्ट झाले. त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या लेखकाला राहीबाई गडबडीत दिसल्या. नव्या कॉंक्रिटच्या घरातून जुन्या मातीच्या घरात बियाणाची “घरवापसी’ सुरू असल्याचे दिसले. कॉंक्रिटच्या इमारतीला गळती लागलेली. दगडविटांच्या या बांधकामात त्रुटी राहिल्यामुळे भिंतीमधून पाणी पाझरू लागले आणि जिवापाड जपलेले बियाणे भिजू लागले. मुलाखतकाराला घेऊन राहीबाई आपल्या जुन्या, मातीच्या घरात गेल्या आणि ते घर अजिबात गळत नाही, हे दाखवून दिले. मातीत रुजणारे बियाणे अखेर मातीच्याच घराने वाचवले. कॉंक्रिटचे घर शोभेचंच ठरले!

राहीबाई राहतात त्या परिसरात खेकडे फारसे नसावेत, असे गृहीत धरूया. कारण मग जुने घरही खेकडे पोखरू शकले असते. “जुनं ते सोनं’ म्हणावे तर “गेल्या पासष्ट वर्षांत…’ या नव्या सरकारमान्य वाक्‌प्रचाराचा अवमान होतो. निकृष्ट बांधकामाची सरकारी परंपरा कायम राहिली असे म्हणावे तर “न्यू इंडिया’पुढे प्रश्‍नचिन्ह लागते. त्यामुळे त्यावर बोलणे व्यर्थ! बीजमातेच्या कार्याबरोबरच तिच्या मातीच्या घरालाही सॅल्यूट ठोकूया आणि सरकारी कामांचे “बियाणं’ बदलण्याची वाट बघूया.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)