अग्रलेख : ‘आउटगोईंग’ची कारणे शोधा

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील मुरब्बी व मुत्सद्दी नेते म्हणून गणना करण्यात येणाऱ्या शरद पवार यांच्या नेत्तृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमधील प्रमुख नेत्यांचे इतर पक्षातील आउटगोइंग निश्‍चितच चिंताजनक आणि पवार यांना चिंतन करायला भाग पाडणारे आहे. पवार यांनी कार्यकर्त्यांना खंबीर राहण्याचे आवाहन केले असले तरी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना घडत असलेल्या या घडामोडी पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करणाऱ्या ठरत आहेत. पवार यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश दिला असला तरी पक्षातील इतर काही नेते तेवढे सकारात्मक नाहीत असेच त्यांच्या विधानावरून दिसते.

जहाज बुडायला लागले की प्रथम उंदीर बाहेर पडू लागतात अशी टीका पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पक्ष सोडणाऱ्यांना त्यांनी उंदराची उपमा दिली असली तरी त्याचवेळी त्यांनी पक्षाचे जहाज बुडत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली हेही मान्य करावे लागेल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाकड आणि निरुपयोगी जनावरे पक्षातून बाहेर पडत असल्याची टीका केली; पण पक्षातून बाहेर पडलेले सर्वच नेते प्रमुख पदांवर कार्यरत होते ही गोष्ट जयंत पाटील यांना विसरता येणार नाही. जे नेते गेली अनेक वर्षं आणि पक्षाच्या स्थापनेपासून “राष्ट्रवादी’सोबत होते, ते प्रस्थापित नेते निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडताना दिसत आहेत याची दखल पक्षाला घ्यावीच लागेल. पक्षाने दुर्लक्ष केलेले किंवा अडगळीत टाकलेल्या नेत्यांनी पक्ष सोडला असता तर ही टीका समजण्यासारखी होती. अर्थात, पक्षातील घडामोडींवर काहीतरी प्रतिक्रिया देणे क्रमप्राप्त असल्याने अशी मते व्यक्‍त होत आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे पक्ष राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असताना मंत्रिपदी राहिलेले, पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारलेले प्रस्थापित नेते आपला पक्ष सोडून सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीच्या आसपासच पक्षातील आउटगोइंग सुरू झाले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांत ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आणि पक्षाला अनेक धक्‍के बसले.

पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी हादरा देणारी ठरली. “राष्ट्रवादी’तल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमधलं महत्त्वाचं नाव म्हणून अहिर यांच्याकडे पाहिले जात होते. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग हाच बालेकिल्ला बनलेल्या राष्ट्रवादीची मुंबईत तशी ताकद कधीच उभी राहिली नाही. सचिन अहिर किंवा संजय दिना पाटील यांच्यासारख्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जोरावरच मुंबईत “राष्ट्रवादी’चे अस्तित्व होते; पण अहिर यांच्यामुळे पक्षाची मुंबईतील स्थिती अधिकच कमकुवत झाली आहे. त्यापाठोपाठ पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिलेला राजीनामा दुसरा धक्‍का होता.

मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर आणि महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासारख्या नेत्यांना पक्ष का सोडावा वाटला याची कारणे पक्षाला शोधावीच लागतील. तसे पाहिले तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडण्यास सुरुवात केली होती. माढ्याच्या उमेदवारीवरून विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे निवडणुकीआधी “भाजपा’त सामील झाले. विजयसिंह मोहिते पाटील यांना “राष्ट्रवादी’नं उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यांचे पुत्र रणजितसिंह “राष्ट्रवादी’च्या स्थापनेपासून पक्षाच्या युवक विभागाचे अध्यक्ष होते आणि खासदारही होते. बीड जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर हे “राष्ट्रवादी’साठी मोठे आणि शरद पवारांशी निष्ठा असणारे नेते होते. आघाडी सरकारच्या काळात “राष्ट्रवादी’नं त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खातीही दिली होती. पण डावलल्याची भावना आणि गटबाजीचं कारण पुढे झालं आणि क्षीरसागरांनीही “राष्ट्रवादी’मधून काढता पाय घेतला. या नेत्यांची मानसिकता पवार यांना समजून घ्यावी लागेल.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्याने राज्यातही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता असल्यानेच विरोधी बाकावर बसण्याची तयारी नसल्याने हे आउटगोईंग सुरू झाले आहे हे उघड आहे. लोकसभा निवडणुकीचे आकडे पाहिले असता राज्यातील 227 विधानसभा मतदारसंघात सेना-भाजपा युतीला आघाडी असल्याचे दिसून येते. 2014 मध्येही ती जवळपास तितक्‍याच मतदारसंघांमध्ये होती. गेल्या पाच वर्षांत ही आघाडी कमी झाली नाही. हे चित्र पाहता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे पुन्हा पाच वर्षं विरोधी पक्षाचे राजकारण करायचे का, हा प्रश्न असल्याने त्यांचा आत्मविश्‍वासही कमी झाला आहे.

दुसरीकडे कॉंग्रेस आघाडी कधी नव्हती इतकी दुबळी झाली आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या आक्रमकतेला आघाडीकडे उत्तर नाही. त्यामुळेच स्वत:च्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय नेत्यांना घ्यावा लागत आहे. हे राजकारण केवळ राष्ट्रवादी नाही तर कॉंग्रेसने समजून घेतले तरच आगामी विधानसभा निवडणुकीत आत्मविश्‍वासाने उतरता येणार आहे.

सध्या राज्यातील पक्षाची परिस्थिती लक्षात घेता आम्ही पुन्हा नव्या चेहऱ्यांना संधी देऊ आणि नव्याने उभारी घेऊ असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्‍त केला असला तरी हे आव्हान सोपे नाही. भाजप आणि सेनेची लाट पाहून आमच्याकडील नेते तिकडे जात आहे. भविष्यात लाट कमी झाल्यावर आमच्याकडे निश्‍चित संख्या वाढेल, असेही पाटील यांनी म्हटले असले तरी भाजप- सेना यांची लाट कमी करण्यासाठी राज्यात विरोधी पक्षच प्रभावीपणे अस्तित्वात नसेल तर हे काम कसे होणार हाच खरा प्रश्‍न आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’चा उल्लेख शरद पवारांनी बांधलेली “निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी’ असा केला होता. पण ज्या “मोळी’ची उपमा त्यांनी दिली होती, “राष्ट्रवादी’ची ती मोळी आता सुटू लागली आहे.ती पुन्हा यशस्वीपणे बांधण्याचे काम आता शरद पवार यांना करावे लागणार आहे. सध्यातरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्‍वास देण्याच्या कामास पवार आणि इतर नेत्यांना प्राधान्य द्यावे लागेल आणि पक्षातील आणखी आउटगोईंग थांबवण्यासाठी रणनीती राबवावी लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)