विज्ञानविश्‍व : मिशन चांद्रयान – 2

file pic

-डॉ. मेघश्री दळवी

पन्नास वर्षांपूर्वी, 20 जुलै 1969 या दिवशी “अपोलो 11 यान’ चंद्रावर उतरलं आणि इतिहास घडला. पुढे नासाने आणखी काही अपोलो यानं चंद्रावर पाठवली. सोव्हिएत रशियानेसुद्धा आपली काही मानवविरहित यानं पाठवली. त्यानंतर काही काळ चांद्रमोहिमा थंडावलेल्या होत्या. मात्र, अलीकडे इतर अनेक देश चंद्रावर आपली यानं पाठवायला पुढे आले आहेत आणि त्यातल्या दोन देशांनी त्यात नेत्रदीपक यश मिळवलं आहे- चीन आणि आपला भारत.

आपलं चांद्रयान-1 नोव्हेंबर 2008 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरलं. त्या मोहिमेत चंद्रावर पाणी आढळल्याचा अतिशय महत्त्वाचा निष्कर्ष मिळाला हे विशेष. या यशाने आपला हुरूप वाढला आणि आता आपण या महिन्यात चांद्रयान-2 हे यान पाठवणार आहोत. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 15 जुलैला यानाचं उड्डाण आणि 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आगमन अशी या मोहिमेची आखणी आहे.

चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिणेच्या भागात उतरवण्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. सौर पॅनेल्सना त्या प्रदेशात भरपूर सूर्यप्रकाश मिळेल आणि तिथे पृष्ठभागावर पाणी आढळण्याची शक्‍यता आहे. यावेळी इस्रो सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करणार आहे. पृष्ठभागाजवळ येताना रॉकेट्‌स वापरून वेग हळूहळू कमी करत अलगद उतरण्याचा हा प्रयत्न असेल. तो यशस्वी झाला तर या दक्षिण भागातलं हे पहिलं सॉफ्ट लॅंडींग असेल.

पूर्णपणे भारतीय बनावटीच्या 3.8 टन वजनाच्या चांद्रयान-2 मध्ये तीन मॉड्यूल्स आहेत. त्यातला ऑर्बिटर हा चंद्राभोवती भ्रमण करत राहणार आहे. योग्य वेळी बाकीचे दोन भाग सुटे होऊन चंद्राच्या दिशेने प्रवास करू लागतील. विक्रम हा लॅंडर प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहे. तर उतरल्यावर प्रज्ञान हा रोव्हर त्यातून वेगळा होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून डेटा गोळा करणार आहे. आजूबाजूच्या प्रदेशाची माहिती मिळवणे, चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन तिचं रासायनिक विश्‍लेषण करणे, तिच्यामधील खनिजांचं प्रमाण निश्चित करणे, खडकांचे नमुने घेऊन त्यांच्या घडणीचा अभ्यास करणे अशी अनेक कामं प्रज्ञान रोव्हर पार पाडणार आहे.

मिळालेली माहिती आणि छायाचित्रं प्रज्ञान विक्रमकडे पाठवणार आहे. विक्रम आणि ऑर्बिटर सतत इस्रोच्या संपर्कात असतील आणि माहितीचं प्रक्षेपण करत असतील अशी योजना आहे. विक्रम आणि प्रज्ञान चंद्रावरचा एक दिवस म्हणजे आपले चौदा दिवस कार्यरत असतील अशी अपेक्षा आहे. ऑर्बिटर मात्र एक वर्षभर चांद्रभ्रमण करत राहील.

चांद्रयान-2 नंतर भारताची पुढची मोहीम असेल चंद्रावर माणसांना घेऊन जाण्याची. आज चंद्र आणि मंगळ इथे वसाहती उभ्या करण्याचे अनेक देशांचे आणि खासगी कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आपणही आपली अवकाश संशोधनातली कर्तबगारी तिथे दाखवणार आहोत. विक्रम लॅंडर चंद्रावर उतरेल तेव्हा त्यावर आपला तिरंगा असेल ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)