भाष्य : स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!

-विठ्ठल वळसे पाटील

स्वातंत्र्य आपसूक मिळाले नाही, ते त्याग, बलिदान देऊन मिळवले आहे. याचा विसर पडून अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराने वागणे, बोलणे, लिहिणे यांचा प्रवास अखंडपणे चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रास्ताविकेतच मानवी मूल्ये मांडली आहेत. याचा विसर आजच्या पिढीला पडला आहे.

150 वर्षांची जुलमी सत्ता संपून ब्रिटिशांनी जाता जाता अखंड हिंदुस्थानचे दोन तुकडे करून ठेवले, एक भारत व दुसरा पाकिस्तान. वंदेमातरम, भारतमाता की जय, इन्कलाब जिंदाबाद अशा स्वातंत्र्य चळवळीतल्या घोषणांनी सारा आसमंत जागा होत होता. पारतंत्र्यात अनेकांनी बलिदान दिले, हे बलिदान, त्याग विसरून जायचे का? स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली तरी आजही प्लॅस्टिकचे झेंडे वापरू नका तसेच रस्त्यावर, कचराकुंडीत झेंडे टाकू नका हे सांगण्याची वेळ यावी, अपेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन, क्रांतिदिनानिमित्त सरकारी व खासगी आस्थापनातील लोकांना ध्वजवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगावे लागते. राष्ट्रीय सणाला सुट्टी जोडून यावी अशी इच्छा असते. असे घडले तर मौज मजा करण्यासाठी अनेकजण फिरायला जातात तर अनेक जणांचे त्या दिवसापुरते राष्ट्रप्रेम जागे होते. शर्ट, गाडी आदी ठिकाणी तिरंगा लावला जातो.

73 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असून स्वातंत्र्याच्या सत्तरीच्या काळात पाकिस्तानबरोबर मोठी चार युद्धे झाली. फाळणीमुळे भारत व पाकिस्तान यांच्यात कायमचे वितुष्ट निर्माण झाले. यात काश्‍मीरचा मुद्दा नेहमी केंद्रस्थानी राहिला. या चार युद्धात आठ हजार सैनिक व अधिकारी शहीद झाले, तर हजारो कायमचे जखमी झाले. संपूर्ण काश्‍मीर ताब्यात घेण्याच्या हेतूने 1947 व 1948 या सालांत पहिले युद्ध झाले, हे काश्‍मीर युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धातून नियंत्रण रेषेचा जन्म झाला. ऑगस्ट 1965 साली दुसरे युद्ध झाले. यात पाकिस्तानने 50 हजार जिहादी उतरवले होते. 1971 साली पाकबरोबर झालेल्या युद्धात चारही आघाड्यांवर युद्ध झाले. यातून बांगलादेशाचा जन्म झाला. 97 हजार 368 पाक सैन्य ताब्यात घेतले. शेवटी पाक सैन्याने शरणागती पत्करली. चौथे युद्ध हे कारगिलचे युद्ध होय. हे 1999 साली झाले. याचे वेगळेपण म्हणजे हे युद्ध 15 ते 19 हजार फूट उंचीवर लढले गेले. यात भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी मोठी शर्थ गाजवली. याशिवाय अनेक ऑपरेशन झाली. शिवाय छोट्या चकमकी चालू आहेतच. चीनबरोबर 1962 साली अनिश्‍चित सीमारेषेवरून झालेल्या युद्धात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. पाकप्रमाणे चीनबरोबर चकमकी होत आहेत. शौर्याची परंपरा राखण्याचे काम सीमेवरील जवान करत आहे.

13 डिसेंबर 2001 साली संसद भवनावर झालेला हल्ला, 2003 साली मुंबईतील कार बॉम्बस्फोट, जुलै 2006 मधील 7 बॉम्बस्फोटात 200 जणांनी जीव गमावला, 2008 साली, जुलै 2011 साली पुन्हा मुंबईत हल्ला, असे अनेक छुपे हल्ले आहेत की, त्यात भारतीय सैन्यासह पोलीस विभागाने आपली शर्थ दाखवली आहे. पण यात त्या त्या वेळच्या सरकारला कोंडीत पकडण्याचे काम विरोधकांबरोबर बुद्धिमान मंडळींनी केले आहे. प्रसारमाध्यमेसुद्धा अपप्रचाराची प्रसिद्धी करत असतात. त्यातून असुरी आनंद लुटला जातो. सुरक्षा व्यवस्था छेदून जाणारे दहशतवादी, अंतर्गत भागात नक्षली कारवाया, त्यांना पाठबळ देणारे खुलेआम फिरत आहेत.

भारताबरोबर स्वातंत्र्य मिळवलेल्या अनेक देशांनी गरूडभरारी घेत प्रगती साधली. स्वातंत्र्यानंतर देशात एक विकासाची लय तयार व्हायला पाहिजे होती मात्र, सत्तेबरोबर मूळचा भांडवलशाही वर्ग व नोकरशहा यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. यात 80 च्या दशकापासून आतापर्यंत 36 मोठे घोटाळे झाले. बोफोर्स, शेअर घोटाळा, मुद्रांक घोटाळा, चारा घोटाळा, 2 जी स्पेक्‍ट्रम घोटाळा, सिंचन घोटाळा, मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धां, आदर्श हाऊसिंग, ओडिशा व झारखंड खाण घोटाळा, खाद्यान्न घोटाळा, नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या यांचे घोटाळे अशा अनेक घोटाळ्यांतून गेलेला पैसा विकासकामांना लावला असता तर देशाची प्रगती नक्‍कीच झाली असती. आज चिंता आहे ती भविष्यातील उद्याची. आम्हाला, आमच्या पिढीला भ्रष्टाचारमुक्‍त देश मिळेल का? वाढता स्वैराचार युवा शक्‍तीला काय आदर्श देणार? पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा राहत आहे. ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी अनेक पिढ्यांची सोय करून ठेवली; पण मागे राहिलेला वर्ग आजही अंधारातून वाट शोधत आहे.

महामानवांच्या पुतळ्यांच्या विटंबना देशाच्या विचाराला कलंक आहे. राष्ट्रपुरुषांच्या जातीनिहाय वाटण्या झाल्या आहेत. अवमानकारक वक्‍तव्य व चर्चा यांना उधाण आले आहे. आता आम्हीच आमच्या देशात राष्ट्रपुरुषांची बदनामी, अवमान करण्याचे धाडस करत आहोत. आजच्या पिढीने स्वातंत्र्याचा संघर्षाचा लवलेश अनुभवलेला नाही. ज्या राष्ट्रपुरुषांना जगात मोठा सन्मान केला जातो त्यांचा अवमान करताना थोडासासुद्धा विचार केला जात नाही. अशा वागण्याला भावी पिढी दोष दिल्याशिवाय राहणार नाही.

देशात पाणी प्रश्‍न, रोजगार, दुष्काळ, वनीकरण अशा अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. असे निःस्वार्थी काम करणाऱ्यांच्या जीवावर हा देश तरला आहे. नव्या पिढी पुढे उज्ज्वल भविष्यासाठीच्या मूल्यांची जागा जर स्वैराचाराने घेतली तर भारत युगाचे स्वप्न अधुरे राहील यात तीळमात्र शंका नाही!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)