विविधा : सार्वजनिक काका

-माधव विद्वांस

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेणारे गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या आईवडिलांचे नाव वासुदेव व सावित्रीबाई होते. त्यांचे मूळगाव कसबा संगमेश्‍वर (रत्नागिरी जिल्हा) पण चरितार्थासाठी त्यांचे पूर्वज देशावर येऊन सातारला स्थायिक झाले. त्यांचे इंग्रजी सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथे झाले.वर्ष 1848 मध्ये त्यांना पुण्यात न्यायालयात कारकून म्हणून नोकरी लागली व ते पुणे येथे आले. वर्ष 1856 मध्ये अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. वर्ष 1865 मध्ये त्यांनी वकिलीची परीक्षा दिली आणि ते पुण्यातच वकिली करू लागले.

वकिलीच्या व्यवसायाबरोबरच ते पुण्यातील सार्वजनिक कामात व्यस्त राहू लागले. अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळविला व ते सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच वेळी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाली. त्यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी त्यांनी फडक्‍यांचे वकीलपत्र घेण्याचे धाडस दाखविले. “फडके यांना फासावर चढवतील तसे मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना?’ असे निर्भय उद्‌गार त्यांनी त्यावेळी काढले होते.

जातिभेदाच्या अनिष्ट प्रथा तसेच स्त्रियांना दुय्यम वागणूक याला त्यांचा विरोध होता.त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी पुढाकार घेऊन 1871 मध्ये पुण्यात “स्त्री विचारवंती’या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे जातिभेद दूर करण्यासाठी हळदीकुंकू यासारखे उपक्रम आयोजित करण्यात येत असत आणि या कार्यक्रमात सर्व जातिजमातींच्या स्त्रिया सामील होत असत. त्यांचे व न्यायमूर्ती रानडे यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. त्यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात 2 एप्रिल 1870 रोजी “सार्वजनिक सभे’ची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी 1872 मध्ये स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला. त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती. त्यांनी 12 जानेवारी 1872 रोजी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली. खादीचा प्रचार व प्रसार त्यांनी केला.

वर्ष 1873 मध्ये महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या दारिद्य्राची माहिती या पाहणीतून पुढे आली. 1876-77 मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सार्वजनिक सभेमार्फत त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळग्रस्त भागात दुष्काळ समित्या स्थापन केल्या. तेथे स्वस्त धान्याची दुकाने उघडली. तसेच सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावीत यासाठी त्यांनी आंदोलनेही केली.

लोकजागृतीच्या कार्यात वृत्तपत्रांचा मोठा सहभाग असल्याची त्यांना जाणीव होती. म्हणून व्हाइसरॉय लॉर्ड लिटनच्या 1878 मधील मुद्रणस्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्याचा त्यांनी निषेध केला. त्यासाठी पत्रकारांचे एक संमेलन 29 मार्च 1878 रोजी मुंबई येथे भरविले. त्यांना हृदयविकार धक्‍का आला व त्यातच त्यांचे 25 जुलै 1880 रोजी निधन झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)