विविधा : पहिली रेल्वे

-माधव विद्वांस

भारतातील पहिली प्रवासी रेल्वे सुरू होऊन आज 166 वर्षे झाली. बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे भारतात धावली व भारतात परिवहन व्यवस्था पहिल्यांदा अमलात आली. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. ब्रिटिशांना भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेचा मोठा उपयोग झाला. 1857 च्या उठावाच्या अगोदर 4 वर्षे याची सुरुवात झाली होती. 33 किलोमीटरचा हा पहिला टप्पा होता.

रेल्वेच्या प्रगतीचा इतिहास खूपच रंजक आहे. “ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (जीआयपी रेल्वे) या कंपनीने ही सेवा सुरू केली. यापुढील सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. मात्र, जीआयपी रेल्वे हीच नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली. 14 कोच असलेल्या रेल्वेत 400 प्रवासी बसले होते.

पहिल्या रेल्वे प्रवाशांमधे जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचा समावेश होता. सन 1845 मध्ये जमशेटजी व शंकरशेट यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय रेल्वे संघाची स्थापना करण्यात आली होती. ते त्यावेळच्या रेल्वे कंपनीचे संचालक होते. वर्ष 1854 मध्ये कल्याणपर्यंत मार्ग वाढविण्यात आला. खरे तर 22 डिसेंबर 1851 रोजी रुरकी ते पिरान कालियारदरम्यान 10 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाची चाचणी झाली होती. तेथील शेतकऱ्यांच्या सिंचन समस्या सोडविण्यास वेळ लागला. पण मुंबई-ठाणे हा मार्ग व्यापारी पद्धतीने 16 एप्रिल 1853 मध्ये कार्यान्वित झाला.

हावडा ते हुगळी हा 36 किलोमीटरचा मार्गही 15 ऑगस्ट 1854 रोजी सुरू झाला व पूर्वेकडील रेल्वेची सुरुवात झाली. दक्षिणेकडे चेन्नईजवळ व्यासरपडी ते अर्काट हा 100 किलोमीटरचा मार्ग 3 मार्च 1859 रोजी कार्यान्वित झाला. उत्तरेकडे हथरस रोड ते मथुरा हा मार्ग 19 ऑक्‍टोबर 1875 रोजी कार्यान्वित झाला. मुंबई-पुणे मार्गातील खोपोलीपर्यंतचे काम 1856 पर्यंत पूर्ण झाले होते. पुण्याकडूनही ट्रॅक बांधण्याचे काम चालू होतेच ते खंडाळापर्यंत सन 1858 मध्ये पूर्ण झाले.

कोकणातील पळसदरी ते खंडाळा हे अवघड काम 1862 मध्ये पूर्ण झाले. बोर घाटाचे अवघड काम संपल्यावर पुणेपर्यंत ट्रॅक पूर्ण होऊन 1871 पर्यंत रायचूरपर्यंत वाढविण्यात आला. त्याचवेळी अर्कोणमकडूनही रायचूरपर्यंत काम पूर्ण झाले व मुंबई चेन्नईपर्यंत रेल्वेने जोडली गेली. हे अंतर 1,281 किलोमीटर एवढे होते.

याचवेळी पूर्व-उत्तर बाजूकडूनही कामे चालूच होती. याचप्रकारे 7 मार्च 1870 रोजी थेट मुंबईहून कलकत्त्यापर्यंत प्रवास सुरू झाला. या ट्रॅकचे उद्‌घाटन तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या हस्ते झाले. सन 1880 पर्यंत 13,500 किलोमीटरचे काम पूर्ण झाले होते.रेल्वेची प्रगती तिच्या एक्‍स्प्रेस स्पीडने चालूच राहिली. आजतागायत वर्ष 2003 चे रेल्वेच्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वे मार्गाची एकूण लांबी 63,140 कि. मी. झाली आहे.

गदिमांच्या झुक झुक आगीनगाडीची धुरांची रेषा कधीच विरून गेली, त्याची जागा डिझेल व बरोबरीने विद्युत इंजिनांनी कधी घेतली ते कळलेच नाही. आज माणसाच्या शरीरातील रातवाहिनीप्रमाणे देशात रेल्वेचे जाळे पसरले आहे, ती भारताची जीवनदायिनी ठरली आहे. मिरज ते लातूर पाणी एक्‍स्प्रेसही 4 वर्षांपूर्वी धावली. भारताच्या सर्व दिशा जोडल्या गेल्या आहेत. कोकण रेल्वेचे आव्हानात्मक काम करून भारतीय अभियंत्यांनी इतिहास घडविला व भारताबाहेरची रेल्वेची कामेही मिळविली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.