अग्रलेख : शैक्षणिक गोंधळ संपायला हवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमधील मंत्री विनोद तावडे यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार दिल्यापासून हे खाते विविध निर्णयांमुळे नेहमी वादग्रस्तच ठरले होते. आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आणि खातेबदलानंतर तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खाते काढून घेऊन ते आशिष शेलार यांच्याकडे दिल्यानंतर वाद आणि गोंधळ थांबतील असे वाटत होते; पण नवे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचे स्वागतही वाद आणि गोंधळाने झाले आहे.

यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा कमी लागलेला निकाल आणि इयत्ता दुसरीच्या गणिताच्या अभ्यासक्रमात केलेला विचित्र बदल हे विषय या गोंधळाला कारणीभूत ठरले आहेत. आगामी काळात हे दोन्ही विषय वाढणार आहेत आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ निस्तरताना शेलार यांच्या नाकी नऊ येणार आहेत. इतर केंद्रीय अभ्यास मंडळांच्या तुलनेने राज्य मंडळाचा निकाल खूपच कमी लागल्याने अकरावीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. शेलार यांनी विधानसभेत या विषयाशी संबंधित प्रश्‍नाला उत्तर देताना अकरावीच्या तुकड्या वाढवण्याची घोषणा केली आहे; पण विद्यार्थ्यांना अपेक्षित अशा महाविद्यालयात प्रवेश मिळवताना त्रास होणार आहेच.

मुख्य म्हणजे अकरावीच्या तुकड्या वाढवणे एवढे सहज शक्‍य आहे का? याचाही विचार होण्याची गरज आहे. अंतर्गत गुणांच्या पद्धतीत बदल झाल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी असाच फटका बसू नये म्हणून काही करता येते का? याचा विचार प्रथम शेलार यांना करावा लागेल. अर्थात, अकरावीचा हा गोंधळ एकवेळ परवडला इतका गोंधळ इयत्ता दुसरीच्या बाबतीत राज्य सरकारने करून ठेवला आहे. हा गोंधळ महाराष्ट्र शासनाच्या नव्या मराठी संख्या वाचनाच्या पद्धतीबाबत आहे. एक्‍काहत्तर, पंच्याऐंशी अशा मराठी संख्या वाचनात जोडाक्षरांचा अडथळा येतो आणि विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारण्यात समस्या येते, असा दावा करून शालेय विद्यार्थ्यांना संख्या वाचनाची नवी आणि वेगळी पद्धत शिकवावी, असा सल्ला महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीशी संबंधित गणित अभ्यास मंडळातील तज्ज्ञांनी दिला आहे आणि नव्या पुस्तकात ही पद्धती अमलात आली आहे.

या नव्या पद्धतीनुसार त्रेसष्ठचे वाचन साठ तीन किंवा त्र्याहत्तरचे वाचन सत्तर तीन असे करावे अशा सूचना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकात देण्यात आल्या आहेत. सरकारचा हा निर्णय समोर आल्यानंतर त्याला झालेला विरोध पाहता सरकारला आणि अभ्यास मंडळाला या निर्णयाबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण हा एकूण प्रकारच हास्यास्पद आहे. जोडाक्षरे उच्चारणे विद्यार्थ्यांना जमत नाही हे या बदलासाठी दिलेले कारण फारच तकलादू आहे आणि समर्पक नाही. जोडाक्षरे हे मराठी तसेच इतर भारतीय भाषांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जगातील इतर भाषांची तुलना केली तर जोडाक्षरांमुळेच मराठी तसेच सर्व भारतीय भाषांतून अधिक वेगाने लेखन, वाचन, बोलणे करता येते. जोडाक्षरे हे मराठी भाषेच्या मूलभूत रचनेशी जोडलेले जगात दुर्मीळ असे एकमेव वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही जोडाक्षरे अवघड जातात म्हणून काहीतरी विचित्र बदल करणे चुकीचेच आहे. कारण केवळ गणित नव्हे तर इतर सर्व विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये मिळून अक्षरशः हजारो जोडाक्षरे असतात.

पहिली इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतरच ती सर्व जोडाक्षरे उच्चारण्याचे शिक्षण सर्व शाळांमध्ये दिले जाते आणि बहुसंख्य विद्यार्थी त्या सर्व जोडाक्षरांचा उच्चार व्यवस्थित करतात. गणिताच्या विषयात संख्या वाचनातील जोडाक्षरांचे प्रमाण शालेय अभ्यासक्रमातील व पाठ्यपुस्तकातील एकूण जोडाक्षरांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. असे असताना विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारणे अवघड जाते या हास्यास्पद युक्‍तिवादाच्या आधारे संख्या वाचनातून जोडाक्षरे वगळण्याचा आणि नवी गुंतागुंतीची पद्धत आणण्याचा निर्णय अयोग्य आहे. हे शालेय शिक्षण खात्याने समजून घेण्याची गरज आहे. कारण या नवीन बदलानुसार संख्यावाचन अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघडच होणार आहे. असा एखादा निर्णय घेताना अभ्यास मंडळाने मराठीविषयक तज्ज्ञाचा सल्ला घेतला होता की नाही याची शंका येते.

कारण संख्यावाचनाची नवीन पद्धती पाहिली तर ती सरळ सरळ इंग्रजीची भ्रष्ट नक्‍कल वाटते. उदाहरणार्थ, इंग्रजीत ज्याप्रमाणे 31 हा आकडा थर्टी आणि वन यांना एकत्र करून “थर्टी वन’ असा उच्चारला जातो. त्याचप्रमाणे आता मराठीत 31 हा आकडा तीस आणि एक यांना एकत्र करून “तीस एक’ असा उच्चारला जाणार आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांची जोडाक्षरापासून सुटका होईल असे सरकारला वाटत असेल, तर प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर करणे किती अवघड आणि गुंतागुंतीचे आहे याची कल्पना सरकारला आणि अभ्यास मंडळाला नाही. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या पालकांकडे 55 रुपये मागायचे असतील तर त्याला आता “पंचावन्न’ या शब्दाऐवजी “पन्नास पाच’ असे म्हणावे लागणार आहे आणि मुख्य म्हणजे यातील पन्नास हा शब्द जोडाक्षरच आहे. सत्तर, नव्वद हे शब्दही जोडाक्षरेच आहेत. हे शब्द जर विद्यार्थी उच्चारू शकतो तर इतर जोडाक्षरांबाबत आक्षेप का? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल.

सर्व काही सुरळीत सुरू असताना कोणाच्या तरी सुपीक डोक्‍यातून अशा विचित्र कल्पना निघतात आणि विनाकारण गोंधळ सुरू होतो. शैक्षणिक आयुष्याच्या सुरुवातीलाच असा गोंधळ होणे परवडणारे नाही. त्यामुळे शिक्षक, पालक आणि शिक्षण तज्ज्ञ या सर्वांनीच याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांची जोडाक्षरे म्हणण्याची क्षमता सुधारण्याऐवजी त्यांना त्यापासून बाजूला नेणारी ही नवीन पद्धत कोणालाही मान्य होण्यासारखी नाही. शालेय शिक्षण खात्याचा कारभार नव्याने हाती घेतलेले आशिष शेलार समंजस आहेत. या निर्णयामागे त्यांचा हात असण्याची शक्‍यता नसली तरी हा निर्णय बदलणे त्यांच्या हातात नक्‍कीच आहे. त्यामुळेच अकरावीचा प्रवेश असो किंवा दुसरीची संख्यावाचनाची नवीन पद्धती असो त्यातून निर्माण झालेला गोंधळ निस्तरण्याचे आव्हान शेलार यांनाच पेलावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.