अग्रलेख : आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष नको

‘नेमेचि येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणेच आता पावसापाठोपाठ आपत्तीही नियमितपणे येतात, असे म्हणावे लागते. पुणे शहरात संरक्षक भिंत पडून झालेली दुर्घटना पाहता ही म्हण जास्तच ठळकपणे समोर येते. केवळ पुणे नाही तर राज्याच्या इतर भागात झालेल्या दुर्घटनांचा विचार करता आपत्ती व्यवस्थापन हा विषय अधिक गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याची गरज लक्षात येते. कोणतीही आपत्ती आली की, काम सुरू करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला आपत्ती टाळणे हेसुद्धा आपले काम आहे हे समजत नसल्यानेच दुर्घटना होत राहतात.

पुण्यातील घटना तर सर्वांचेच डोळे उघडणारी ठरली आहे. रहिवासी सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. मुसळधार पावसामुळे सोसायटीचे कपाऊंड खचलं आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली आणि त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मोठ्या बांधकामांसाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या झोपड्या होत्या. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे सोसायटीची भिंत कोसळली आणि मजुरांचा बळी गेला.

दुसरीकडे मुंबईतल्या चेंबूर भागातही रिक्षांवर भिंत कोसळली आहे. भायखळा भागातही नुकतीच भिंत कोसळून दुर्घटना घडली होती. दादरमधील फुल मार्केटमध्ये भिंत कोसळून तीनजण जखमी झाले आहेत. विजेचा धक्‍का लागल्याने अंधेरी आणि गोरेगावमध्ये तिघांचा मृत्यू झाला. भिवंडी-ठाणे रोडवर शाळेच्या समोरील उघड्या गटारात पावसाचे पाणी साचल्याने एक विद्यार्थिनी आणि तिची आई पडल्याची घटना घडली आहे. नागपूर परिसरात जोरदार पावसामुळे जिल्हा परिषद शाळेचा पत्रा कोसळून 8 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांतील अशी कितीतरी उदाहरणे देता येतील आणि आगामी काळातही अशा घटना घडतच राहतील.

दरवर्षी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहिली जात असली तरी या पावसासाठी आणि पावसाच्या अनुषंगाने येणाऱ्या आपत्तीसाठी आपण तयार असतो की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल. वर उल्लेख केलेल्या सर्व घटना या पावसाळी हंगामाच्या प्रारंभी घडल्या आहेत. पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. त्यामुळे अती पावसामुळे निर्माण होणाऱ्या महापूर आणि तत्सम आपत्तीसाठी आपण किती तयार आहोत याला शंका घ्यायला जागा आहे. पावसाळी हंगामात इमारती आणि भिंत कोसळण्याचे प्रकार नेहमीच घडतात तरीही त्याची कल्पना संबंधित विभागाला नसते याचेच आश्‍चर्य वाटते. मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करून संबंधिताना नोटिसा जातात; पण येथेच हे काम संपते का, याचा विचार व्हायला हवा.

महानगरात सुरू असलेल्या हजारो बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरती बांधकामे उभारली असतात ही बांधकामे नाजूक आणि धोकादायक असल्याची जाणीव आणि कल्पना कंत्राटदार आणि बिल्डर यांना असते. तात्पुरत्या बांधकामात पत्र्याचा केलेला वापर आणि वाटेल तशा ओढलेल्या वीजवाहिन्या नेहमीच धोकादायक असतात; पण पावसाळ्यापूर्वी अशा ठिकाणांचे ऑडिट करून संबंधिताना सावध करण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून होत नसल्याने दुर्घटना घडतात आणि त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे काम सुरू होते. दुर्घटनेनंतर ढिगारे उपसणे एवढेच आपत्ती व्यवस्थापनाचे काम नाही तर आपत्ती येऊ नयेत म्हणून काळजी घेणे हेसुद्धा त्यांचेच काम आहे. नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो किंवा जिल्हापरिषद असो पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्याचे कर्मकांड पार पडले जाते; पण हे सर्व नियोजन आपत्ती आल्यानंतर काय करायचे याबाबत असते. आपत्ती येऊ नये म्हणून कोणताही आराखडा आखल्याचे दिसत नाही.

मुंबई महापालिकेने यावर्षी घेतलेली दक्षता त्याला थोडी अपवाद मानावी लागेल. यंदा यावर्षी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा 33 वेळा आल्या असून यात पाच दिवसांतून दोन वेळा उधाण येणार आहे. शहरात पडणारा संततधार पाऊस आणि त्यात भरतीचे पाणी अशा प्रकारे नवी मुंबईत काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असल्याचा अनुभव आहे. पावसाच्या पाण्यामुळे शहरात 44 ठिकाणी पाणी साचण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पालिकेने आठ विभागांत आठ नियंत्रण कक्ष तयार ठेवले आहेत. सातत्याने पावसाचा अंदाज घेणारी यंत्रणा पालिका मुख्यालयात तैनात ठेवण्यात आली आहे. अर्थात येथेही पाणी साचले तर काय करायचे यावरच भर देण्यात आला आहे. मुळात पाणी साचू नये म्हणून काय करावे याचा विचार केलेला नाही. सर्वच ठिकाणी अशीच अवस्था आहे. दुर्घटना घडूच नये म्हणून कोठेच गांभीर्याने विचार होताना दिसत नाही.

खरेतर सरकारी यंत्रणांकडे सर्व माहिती आणि आकडेवारी उपलब्ध असते. दुर्घटना कशी आणि कोठे घडू शकतात याचा अंदाज त्यांना असतो; पण केवळ कामातील शैथिल्य आणि निष्काळजीपणा यामुळे त्यांना या दुर्घटना टाळता येत नाहीत. अर्थात पुण्यातील घटना पाहता सरकारी यंत्रणांबरोबरच समाजातील इतर खासगी घटकांनाही जबाबदार धरण्याची गरज आहे. या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, हे योग्यच आहे. कारण ज्याअर्थी मध्यम तीव्रतेच्या पावसातही भिंत कोसळली त्याअर्थी भिंत बांधताना तांत्रिक दक्षता घेण्यात आली नव्हती. निष्काळजीपणाने काम उरकण्यात आले होते त्यामुळेच भिंत कोसळून निष्पाप मजुरांचा बळी गेला. सर्वच बांधकाम व्यावसायिकांनी धडा घ्यावा अशी ही दुर्घटना आहे.

सरकारी यंत्रणांनी ऑडिट केले नाही हे खरे असले तरी बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःही काळजी न घेतल्यानेच ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट दिसते. पावसाळी हंगाम आताशी कोठे सुरू झाला आहे. त्यातच आपत्तीची ही चुणूक पाहायला मिळत असेल तर आगामी काळात किती सावध राहावे लागेल याचा विचार करायला हवा. संभाव्य घटनांचा आढावा घेऊन त्या घटना घडू नयेत यासाठीच काम करायला हवे. आपत्ती घडू नयेत म्हणून काम करणे हेच आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य काम आहे हे विसरून चालणार नाही. दुर्घटना टाळण्याला प्राधान्य न देणे महागात पडू शकतो याचाच धडा पुण्यातील घटनेने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.