अभिवादन – छत्रपती राजर्षी शाहू : तपस्वी युगपुरुष

विठ्ठल वळसेपाटील

महात्मा फुले यांच्या निधनानंतर 1890 दशकात समाजसुधारणेत एक पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी राजर्षी शाहू महाराज सरसावले. स्वतः राजे असताना दलित, मागास, शोषित, वंचित, उपेक्षित भटक्‍या समाजांतील हीन-दीन झालेल्यांच्यात मिसळून त्यांना समता, बंधुत्व आणि ममतेच्या मार्गाने वागवले. सर्वांची उन्नती व्हावी ही सार्वजनिक महत्त्वाकांक्षा बाळगली आणि सार्वजनिक शिक्षणकार्याची पायाभरणी केली. आज या युगपुरुषाची जयंती, त्यानिमित्ताने…

18व्या शतकाचा उत्तरार्ध व 19व्या शतकाच्या पूर्वार्धातही भारतीय समाज जातिव्यवस्थेतून बाहेर पडायला तयार नव्हता. त्यामुळे नव्या समाजनिर्मितीसाठी शिक्षणाची दारे खुली झाली पाहिजे या ध्येयाने राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःला वाहून घेतले. 26 जून या जन्मदिनी त्यांच्या कार्याचा गौरव होतो. कृषी, तंत्रज्ञान, समाजसुधारणा, धार्मिक कार्य, कला, क्रीडा, संस्कृती जतनाबरोबर शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.

2 एप्रिल 1894 साली कोल्हापूर संस्थानाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. शाहूंनी महात्मा फुलेंचा शैक्षणिक वारसा पुढे सुरू ठेवून अनेक धोरणात आमूलाग्र बदल केले. शिक्षणाची गंगा दीनांच्या दारी आणली. 1896 साली अस्पृश्‍यासाठी फक्‍त 6 शाळा होत्या. ही संख्या त्यांनी 25 पर्यंत नेत विद्यार्थीसंख्या 850 वर नेली. पुढे अस्पृश्‍यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून कोल्हापूर, पंढरपूर, नागपूर आणि नाशिक येथे वसतिगृहे उभारली शिवाय शुल्कमाफीचा आदेश 1991 साली काढला. शिष्यवृत्ती सुरू केली. अस्पृश्‍यांना वकिलीच्या सनदा दिल्या. राजवाड्यात नोकऱ्याही दिल्या.

अस्पृश्‍य समाजातील अनेक संत, महात्मे, आपल्या योग्यतेने पुढे आले हे त्यांनी अस्पृश्‍य समाजाच्या मनावर बिंबवले. अस्पृश्‍य समाजात निर्भयता निर्माण करून तेसुद्धा मोठी कामे करू शकतात हा विश्‍वास त्यांच्यात निर्माण केला. अस्पृश्‍यता निर्मूलनासाठी बोलणारे पुढारी नकोत तर कृती करून वागणारे हवेत, असे त्यांनी समाजाला ठणकावून सांगितले. अस्पृश्‍यवर्ग समर्थ करणे हीच राजर्षींचे ध्येय धोरणे होती. शाहू महाराजांजवळ सामाजिक दृष्टिकोन व्यापक होता. त्यांनी मागासवर्गाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी राखीव जागांची तरतूद केली. 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात 50 टक्‍के जागा राखीव राहतील अशी त्यांनी घोषणा केली. त्वरित अंमलबजावणी करून अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविले. त्यामुळे मागासवर्गाला नोकरीची दारे उघडली.

शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्‍यांना समानतेने वागवण्याचा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1913 साली राजर्षी शाहू यांनी मोफत व सक्‍तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. शाळेत मुलांची वयोमर्यादा ठरली, मुले शाळेत आली नाही तर पालकांना दंडही सुरू केला. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1916 साली निपाणी येथे “डेक्‍कन रयत असोसिएशन’ ही संस्था उभी केली. विशिष्ट वर्गाची मक्‍तेदारी संपुष्टात येऊन बहुजनवर्ग आता शिक्षण व राजकीय क्षेत्रात पाऊल टाकू लागला. शिक्षणावाचून अस्पृश्‍य व बहुजन समाजाची प्रगती थांबलेली पाहून आपल्या संस्थानात शैक्षणिक सुधारणांसाठी शैक्षणिक कायदे केले. 1916 साली सक्‍तीचा शिक्षण कायदा केला. पुढे त्यात 1919 साली सुधारणा केल्या. प्राथमिक शिक्षणाबरोबरच पुढील शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतले.

1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. 1911 साली त्यांनी पुरोहित शाळा काढली. “घरचा पुरोहित’ हे पुस्तक सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. भावी राजा व सरदार यांची जडणघडण व्हावी, प्रजेचे हित व समस्या समजाव्यात यासाठी युवराज शाळा सुरू केल्या. गावचा कारभार पाटील पाहात असे. अनेक पाटील अशिक्षित होते म्हणून पाटील शाळा सुरू करून गाव व ग्रामपंचायत यातील महत्त्वाचा दुवा पाटील ठरला. शेतकरी, सैनिक, कारागीर यांनी केवळ वंशपरंपरा न चालवता उद्योगव्यवसायाकडे वळावे यासाठी राजर्षींनी 1912 साली जयसिंग घाटगे टेक्‍निकल इन्स्टिट्यूट स्थापन केली.

इंग्रजी भाषा वाढत असताना संस्कृत मागे राहू नये म्हणून पुरोहित शाळेतून तयार झालेल्या पुरोहितांकडून संस्कृतीचे जतन करण्याचे काम केले. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव यावर आधारित महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती करून सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. राजर्षींनी 1911 साली कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली व 1913 साली सत्यशोधक शाळा सुरू केली. सामाजिक उन्नती, संरक्षण व भविष्यात देशासाठी निष्ठावंत सैनिकांची आवश्‍यकता आहे. या हेतूने त्यांनी इन्फन्ट्री स्कूल सुरू केले.

शिकार करून जीवन जगणाऱ्या फासेपारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी स्थिर वसाहत दिली तसेच नाच, खेळ करून किंवा भिक्षा मागून जीवन जगणारा डोंबारी समाजसुद्धा मुख्य प्रवाहात आणला. त्यांच्या वसाहतीत एक शाळा सुरू करून राजांनी एक आदर्श निर्माण केला. राजर्षी हे कला, क्रीडा, संगीत, नाट्यप्रेमी होते. त्यांनी कलाकारांना राजाश्रय मिळवून दिला.

शिक्षण घेणे सर्वांना परवडणार नाही म्हणून वसतिगृह स्थापन केली. ही वसतिगृहे पुढे शिक्षण चळवळीचा पाया ठरली. मराठा बोर्डिंग, दिगंबर जैन बोर्डिंग, लिंगायत वसतिगृह, मुस्लीम बोर्डिंग, मिस क्‍लार्क हॉस्टेल अशी विविध जातिव्यवस्थेतील मुलांसाठी बोर्डिंग सुरू करून शिक्षणाची गंगा समाजापर्यंत पोहोचविली. महिलांचा सन्मान उंचावला, दलितांसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साहाय्य केले. शिक्षणाची महती व सारे आयुष्य समाजउन्नतीसाठी खर्च केले.

1919 साली छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याच्या गौरवानिमित्त कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना “राजर्षी’ पदवी बहाल केली. राजे असूनसुद्धा त्यांनी कधी “मी’पणा दाखवला नाही. असा लोककल्याणकारी राजा 1922 साली निवर्तला. उण्यापुऱ्या 28 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेले कार्य हे एका तपस्वी युगपुरुषासारखे आहे. राजर्षी शाहूंच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी समाजसुधारणेचे कार्य पुढे चालवले. त्यांचे जीवनकार्य युगेयुगे मार्गदर्शक राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.