प्रेरणा : इंजिनिअरिंग पदवीधर शेतकरी

प्रातिनिधिक फोटो

-दत्तात्रय आंबुलकर

एक काळ असा होता की त्यावेळी व्यवसाय-रोजगाराच्या संदर्भात “उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी’ ही धारणा प्रचलित होती. काळानुसार यामध्ये बरेच बदल झाले व शेतीला कनिष्ठच नव्हे तर गौण स्थान मिळत गेले. या बदलत्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी शेतीकडे दुर्लक्ष न करता उलट आपली इंजिनिअरिंगची पदवी व त्यापोटी मिळणारी नोकरी व आर्थिक लाभ सोडून गावाकडे येऊन शेतीत रमणाऱ्या युवा इंजिनिअरिंग पदवीधरांची संख्या मर्यादित असली तरी त्यांचे कार्यकर्तृत्व अनेकांना अनेकार्थांनी प्रेरणादायी ठरते.

27 वर्षीय अभिषेक धामा या युवा इंजिनिअरने शेतात काम करण्याचा आपला मनोदय घरच्यांना सांगितला. त्यावेळी त्याच्या घरच्यांचा स्वाभाविक प्रश्‍न होता की शेतीच करायची होती तर इंजिनिअरिंगची पदवी का म्हणून घेतली? मात्र, अभिषेक धामाने आपली इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची नोकरी सोडून आपल्या भावासह शेतीची वाट धरली. इंजिनिअर अभिषेक धामाकडून प्रेरणा घेऊन त्याचा इंजिनिअर भाऊ विशाल शौकीन यानेही इंजिनिअरिंग पदवी घेतल्यानंतर तोही शेतात रमला आहे. आता तर या दोघा भावांनी आपले विज्ञान-संगणकशास्त्र यांची सांगड घालून शेतकऱ्यांसाठी “ऑनलाइन’ पद्धतीने मार्गदर्शनपर प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

या शेतकरी मार्गदर्शन सत्रात जमिनीचे विश्‍लेषण-तपासणी, बियाणांचा दर्जा, खतांचे प्रयत्न व वापर, आपत्तीकाळात पीक रक्षण, पाण्याचा समुचित वापर, प्रगत सिंचन पद्धती, उत्पादित मालाचे पॅकिंग-वितरण इ. बद्दल सोप्या व त्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करीत असतात व त्याचा मोठाच फायदा शेती आणि शेतकऱ्यांना होत आहे. तंत्रज्ञानाची कृषी क्षेत्राशी होणारी ही सांगड म्हणूनच शेतकऱ्यांना मार्गदर्शकच नव्हे तर लाभदायी पण ठरली आहे. आज दोन्ही भाऊ आपापल्या कामात खूश आहेत.

गोव्याच्या अजय नाईकला गोव्याच्या खाद्यपदार्थांची विशेष आवड होती. संगणकशास्त्रातील इंजिनिअर असणाऱ्या अजय नाईकने 10 वर्षे संगणक इंजिनिअर म्हणून काम केल्यावर संगणक विज्ञानाची चाकोरी सोडून नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली. यामागे अजयचा मुख्य उद्देश आपल्या संशोधनाद्वारे नैसर्गिक व सेंद्रिय स्वरूपाचे व चविष्ट भाजीपाला व धान्याचे उत्पादन करणे हा होता. त्याच्या मते आज कृषी क्षेत्राला अभियांत्रिकी-संशोधनाची जोड मिळाली तर कृषी उत्पादनाला अधिक उत्पादक व शेतीला निश्‍चितपणे फायदेशीर बनविले जाऊ शकते. कोलकात्याच्या अभिषेक सिंघानियाने कृषी क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

अभिषेक हा धातुशास्त्र विषयातील इंजिनिअर असला तरी गेली चार वर्षे त्याने शेतीचा शास्त्रोक्‍त अभ्यास केला. त्यादरम्यान त्याला प्रामुख्याने असे आढळून आले की आज आपल्या शेतीत रासायनिक खतांचा फार मोठ्या प्रमाणात वापर होत असून त्याचा विपरीत परिणाम शेती, शेतकरी व नागरिक-ग्राहक या साऱ्यांवर होत आहे. अभिषेकने याचा विशेष अभ्यास केला व रासायनिक खतांचा खर्च आणि उपयोग टाळल्यास शेती अधिक उपयुक्‍त होऊ शकते ही बाब सिद्ध केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)