व्यक्‍तीवेध : संस्कारांची शिदोरी

– नारायण ढेबे

अरुणा ढेरे या ज्येष्ठ इतिहासकार रा. चि. ढेरे यांच्या कन्या आहेत. त्यांनी वडिलांच्या विश्‍वाबरोबरच आपलं स्वतःचं असं एक वेगळं विश्‍वही जपलं आहे. वडिलांचा वारसा सशक्‍तपणे सांभाळता सांभाळता आपला एक वेगळा परिघ निर्माण करणारी माणसं समाजात फारशी दिसत नाहीत. मात्र त्याला अपवाद आमच्या अरुणा मावशी आहेत.

अरुणा ढेरे आणि माझा परिचय हा डॉ. वीणा देव यांच्यामुळे झाला. मला आठवतंय एखादी वस्तू, पुस्तक किंवा खाण्याचा एखादा पदार्थ घेऊन मी अरुणा ढेरे यांच्याकडे जायचो. तेव्हा अरुणा मावशी माझी भरभरून चौकशी करायच्या, त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळा कप्पा निर्माण झाला. त्यांच्याबद्दलची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा दिवसेंदिवस वाढतच राहिला. त्याचं कारण म्हणजे त्यांचा साधा स्वभाव. एखादी अडचण आली की मी त्यांना विचारायचो तर कधी एखादे पुस्तक वाचून त्यातील पात्रांवर चर्चा व्हायची तर कधी त्यातील लेखन, सुरुवात शेवट यावर त्या नेहमी बोलायच्या.

अरुणा ढेरे या मला नेहमी वाचन आणि लेखन यावर बोलायच्या. तू ते पुस्तक वाचलंस का, त्यात खूप छान त्या लेखकाने लिहिलंय, तू ते वाच. त्याचा तुला नक्‍कीच फायदा होईल. या ठामपणे सांगणाऱ्या अरुणा ढेरे जेव्हा जेव्हा वीणा देव यांच्याकडे यायच्या तेव्हा तेव्हा त्यांच्यात जी चर्चा व्हायची त्याचा एकमेव साक्षीदार मी असायचो. ही चर्चा रा. चि. ढेरे आणि गो. नी. दांडेकर यांच्या तब्येतीविषयी असायची आणि मग ती हळूहळू एखाद्या साहित्यकृतीवर यायची.

त्या पुस्तकाचा, लेखनाचा संपूर्ण बायोडाटाच समोर यायचा. ही चर्चा दोन दोन तास चालायची. मात्र, त्यांच्यात झालेली चर्चा ही माझ्या मनात घर करायची. एखादं पुस्तक, कसं वाचायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा या गोष्टी मी शिकत गेलो. आज मी जे काही लिहितोय त्यात वीणा देव आणि अरुणा ढेरे यांनी माझ्यावर केलेले जे काही संस्कार आहेत त्यामुळेच. कारण त्यांच्या सहवासात आल्याने मला खऱ्या अर्थाने साहित्याचं जग कळलं.

ढेरे मला जेव्हा भेटतात तेव्हा माझ्या हातात हक्काने एखादे त्यांचे पुस्तक ठेवतात आणि म्हणतात, हे पुस्तक तू वाच खूप सुंदर आहे. त्यांच्या घरी गेल्यानंतर एखादं नवीन पुस्तक हातात पडणार हे मात्र नक्‍कीच. हा आमचा हक्‍काचा खाऊ. त्याच खाऊमधून माझ्यावर वाचन आणि लेखन याचे संस्कार झाले.

जेव्हा कधी त्यांच्या पुढे मी उभा राहतो तेव्हा हसतमुख असलेल्या अरुणाताई “अरे कुठे आहेस तू, खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही’, असं म्हणत त्यांचं एक पुस्तक हातात ठेवणार. नकळत माझे हात त्यांच्या पायाकडे जातात आणि पुस्तकाबरोबर हळूच पाठीवर त्यांचा हात जातो आणि आशीर्वाद मिळतो. या गर्दीतही मी पुढे सरकतो. एक आनंद घेत संस्कारांची शिदोरी घेत.

Leave A Reply

Your email address will not be published.