लेटर्स फ्रॉम इजिप्त : व्हॅली ऑफ किंग्जची सफर : 1

-श्‍वेता पटवर्धन

लक्‍सोर, इजिप्त

प्रिय जिज्ञासा,

मागच्या दोन्ही पत्रात मी साधारण 5000 वर्षे जुन्या इतिहासाबद्दल लिहिले होते. साधारण त्याच काळात घडवलेल्या एका स्थळाला मी नुकतीच भेट दिली. ते इजिप्तच्या दक्षिणेकडे असलेल्या लक्‍सोर नावाच्या छोट्याशा गावात आहे. हे लक्‍सोर दक्षिणेला जरी असले तरी ते अपर इजिप्तमध्ये येते. या अपर आणि लोअर इजिप्तची मोठी गंमत आहे.

मी एका पुस्तकात वाचले होते की अपर इजिप्त म्हणजे दक्षिण इजिप्त आणि लोअर इजिप्त म्हणजे उत्तर इजिप्त. असे का माहितीये? नाईल नदी इजिप्तमध्ये दक्षिणेकडून प्रवेश करते म्हणून ते अपर इजिप्त आणि ती उत्तरेला मेडिटेरियन समुद्राला मिळते म्हणून ते लोअर इजिप्त. दिशा काहीही सांगत असल्यातरी इजिप्शियन लोक नाईल नदीला प्रमाण मानतात. यावरून त्यांच्या आयुष्यातील नाईलचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते.

तर या अपर इजिप्तमधील लक्‍सोरमध्ये व्हॅली ऑफ किंग्स नावाची जागा आहे. इथे विविध राजांच्या कबरी उत्खननात सापडल्या. आता तू म्हणशील की राजे तर कबर म्हणून पिरॅमिड्‌स बांधत होते. अगदी बरोबर आहे पण ते केवळ ऑल्ड किंग्डम मधले राजे. न्यू किंग्डममधले राजे आपल्या ममीज ठेवण्यासाठी डोंगरात खोल खणून आपली कबर आपल्या हयातीतच बांधून ठेवत. व्हॅली ऑफ किंग्स या डोंगराळ भागात अशा कित्येक राजांनी कबरी बांधल्या आहेत. त्यापैकी साधारण 63 कबरी आजपर्यंत सापडल्या आहेत; परंतु अजून कित्येक कबरी तिथे असण्याची शक्‍यता वर्तवली जाते.

ऑल्ड किंग्डमप्रमाणे न्यू किंग्डममधील राजे देखील पुनर्जन्मावर गाढा विश्‍वास ठेवत. त्यांनादेखील त्यांची ममी पुरून ठेवण्यासाठी जागा हवी असे. परंतु ऑल्ड किंग्डममधील राजांप्रमाणे त्यांना स्वत:चे भव्य स्मारक बनवण्यात रस नव्हता तर त्यांना ते सर्वांपासून, अगदी त्यांच्या वंशजांपासून, गुपित ठेवायचे होते. म्हणून त्यांनी त्यांच्या हयातीत गुप्तपणे कबरी खोदून घेतल्या. त्या कबरींमध्ये खाली उतरल्यावर तळाला ममी ठेवण्यासाठी एक चबुतरा (त्याला ते मास्ताबा म्हणत) असलेली खोली आहे. तसेच बऱ्याच कबरींमध्ये त्या खोलीच्या शेजारी खजाना ठेवायला खोल्या बांधून घेतल्या आहेत. परंतु तेथील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मास्ताबापर्यंत जाण्याच्या वाटेवरील भिंतींवर राजांनी हेरोग्लीफ्समध्ये पुराणातील आणि रोजच्या जगण्यातील प्रसंगांचे चित्रण कोरून घेतले आहे.

काही कबरींमध्ये छोट्या छोट्या खोल्या बनवून घेतल्या आहेत, ज्यामधील प्रत्येक खोली आयुष्यातील एखादा भाग दर्शवते. उदा, एका खोलीमध्ये मातीच्या भांड्याची चित्रे, एका मध्ये वाद्यांची चित्रे, इत्यादी. यामागे असा समज होता की, यातील काहीही फारोला पुढच्या जन्मी कमी पडू नये. तसेच देव फारोंना काहीतरी दान करत आहेत याची देखील कित्येक चित्रे इथे सापडतात.

यातील प्रत्येक चित्र फारो स्वतः जातीने ठरवत असे म्हटले जाते. सगळ्या राजांनी एकाच दरीत गुप्तपणे कबरी खोदल्यामुळे पुढील पिढ्यांना कबरी नक्की कोठे आहेत ते माहीत नव्हते. त्यामुळे एक राजा त्याची कबर खोदून घेत असताना त्याच्याच पूर्वजांच्या कबरीला येऊन थडकला. पुढे खोदणे शक्‍य नाही असे समजून त्याने ती कबर सोडून दुसरीकडे खोदायला सुरुवात केली; परंतु त्याच्या मुलाने अत्यंत शिताफीने त्या टी पॉइंटला न थांबता तिथे वळसा घेऊन स्वतःसाठी कबर खोदून घेतली.

अशा कित्येक गमतीजमती या व्हॅलीमध्ये आपल्याला सापडतात. याबद्दल मला तुला अजून खूप काही सांगायचे आहे, पण आता वेळ नाही म्हणून हे पत्र इथेच संपवते. पुढच्या पत्रात पुन्हा एकदा या व्हॅलीची सैर करू.

तुझी ,
– प्रवासी मावशी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)