विशेष : मराठी असे आमुची मायबोली

-विठ्ठल वळसेपाटील

ज्यांचा जन्मदिन आज “मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा होतो ते ऋषीतूल्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे दैनिक प्रभातमध्ये 1939 ते 1945 या कालावधीत कार्यरत होते. त्यांच्या लेखणीचा अविष्कार वाचकांना प्रभातमधूनही अनुभवायला मिळाला.आज मराठी राजभाषादिनी मराठी भाषेचा विविधांगांनी घेतलेला परामर्श.

जगभरातील मराठी बांधव 27 फेब्रुवारी हा दिवस “मराठी राजभाषा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करतात. महाराष्ट्रातील प्रतिभावंत ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात व साहित्यात मोलाचे योगदान दिले असून “माय भाषा ही ज्ञानभाषा’ होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. राज्य शासनाने 21 जानेवारी 2013 पासून 27 फेब्रुवारी दिवस हा “मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. कवी कुसुमाग्रज आणि अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेचा गौरव वाढविला आहे.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी गझलकार सुरेश भट यांच्या गझलेत मराठीच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. महाराष्ट्रात अनेक जाती, पंथ, परदेशी, परप्रांतीय लोक गुण्यागोविंदाने राहतात. कारण या भाषेच्या बोलीत मोठा गोडवा दडला आहे. अनेक बोली भाषेतून अनेक शब्द आले ते आपले झाले. अनेकांनी मराठी भाषा शिकली आणि तिला साहित्याच्या माध्यमातून एका उंचीवर नेले. महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. कोकणी, अहिराणी, माणदेशी, खान्देशी, मालवणी, वऱ्हाडी याबरोबर अनेक जाती जमातीतील व आदिवासी तसेच भटक्‍या समाजात अनेक भाषा बोलल्या जातात परंतु लिखावट मात्र देवनागरी वापरतात. जिल्ह्यानुसारसुद्धा भाषा बदल दिसून येतो. प्रत्येक जिल्ह्यात मराठीच बोलली जाते परंतु बोली भाषेतील गोडवा, भावुकता, रांगडेपणा आदरातिथ्य दिसून येते. या भाषा समजणे सोपे असले तरी भटक्‍या व आदिवासी समाजातील बोली उच्चार संवर्धनाची गरज आहे.

इंग्रजीतील प्रत्येक शब्दाला मराठी शब्द आहेत. तो वापरणे म्हणजे मराठी भाषेचे सौंदर्य टिकवण्यासारखे आहे. मराठी समजणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. वि. दा. सावरकर यांनी मराठी भाषेत अनेक पुर्वापार रूढीत असलेले व नवीन शब्द प्रचलित केले. यात खबर ऐवजी वृत्तपत्र सारखा शब्द किर्लोस्करच्या संपादकांना वापरण्यास सांगून वृत्तपत्र हा शब्ध रूढ केला. तसेच महापौर, दिनांक, विश्‍वस्त, प्राचार्य, प्राध्यापक, अर्थसंकल्प, महापालिका, पर्यवेक्षक, चित्रपट, बोलपट, स्तंभ, टपाल, दिग्दर्शक, दूरदर्शन, नभोवाणी, क्रीडांगण असे अनेक शब्द मराठी भाषेत सावरकरांनी उतरवले. आजही मोबाइलला “भ्रमणध्वनी’ असा मराठी शब्द असला तरी तो वापरला जात नाही. आपण परकीय शब्द अंगीकारल्याने असे होते. खरेतर मराठी भाषा किती समृद्ध आहे याचा आपल्याला अभिमान हवा. साडी हा प्रकार विदेशात नसल्याने त्यास साडी म्हणायची प्रथा पडली आहे. मराठी भाषा ही प्रत्येक शब्दाला पर्याय देणारी आहे. म्हणूनच तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

इये मराठीचिये नगरी ।
ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
देणे-घेणे सुखचि वरी ।
होऊ देई या जगा ।।

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीच्या बाराव्या आध्यायातल्या या ओवीतून गुरू, बंधू निवृत्तीनाथ यांना मातेच्या रूपात पाहून मराठी भाषेची समृद्धी व विपुलता व्यक्‍त केली आहे. मराठी भाषा एक नगरी आहे. यातून मराठी भाषेच्या नगरात ब्रह्मविद्येचे वैपुल्य असू दे, यातून देवघेवीचे व्यवहार सुखरूप होऊ दे अशी विनवणी गुरूंकडे केली आहे. ब्रह्मविद्या व शब्दब्रह्मही त्यांनी म्हटले आहे. अशाच संत वचनातून व वाणीतून मराठी भाषा समृद्ध होत गेली.

माझा मराठीची बोलू कौतुके ।
परि अमृतातेहि पैजासी जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।

मराठी भाषेच्या वैभवाचे महत्त्व विशद करताना संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी मराठी भाषेची समृद्धता समपर्क वर्णली आहे. अमृतालाही जिंकणारी, रसिक श्रोते मंत्रमुग्ध करणारी भाषा आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी व भावार्थ दीपिका ग्रंथ प्राकृत भाषेत मांडून सवर्सामान्य लोकांना समजेल अशी रचना केली. माऊलींनी पसायदानातून विश्‍वकल्याणाचा विचार मांडला.

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

सातशे वर्षे परंपरा लाभलेल्या वारकरी सांप्रदायाने मराठी भाषेचा विकास केला. यात संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्‍ताबाई, संत एकनाथ, संत तुकाराम तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबांनी आपापल्या बोली भाषेप्रमाणे तिला अभंगवाणीतून प्रकट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.