विविधा | माधुरी दीक्षित

– माधव विद्वांस

ती आली, तिने बघितले आणि तिने सगळ्यांनाच जिंकले. धक धक गर्ल म्हणून प्रसिद्ध, मराठी असूनही हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षित-नेने हिचा आज वाढदिवस. माधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबई येथे झाला. 

माधुरीने अंधेरी येथील डिव्हाइन चाइल्ड हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच तिला नृत्याची आवड होती. वयाच्या 9 व्या वर्षीच तिला नृत्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तिने कथ्थक नृत्यामध्ये नैपुण्य मिळविले. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होण्याची इच्छा असलेल्या माधुरीने विलेपार्ले (मुंबई) येथील महाविद्यालयात सूक्ष्मशास्त्र विभागात प्रवेश घेतला. मात्र सहा महिने झाल्यावर चित्रपटांमध्ये पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनयाला नृत्याची जोड मिळाल्यामुळे तिचे बॉलीवूडमधील स्थान लवकरच बळकट झाले.

माधुरीने वर्ष 1984 मध्ये “अबोध’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीस दयावान (हिंदी चित्रपट) आणि वर्दी यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्या. वर्ष 1988 साली तिने “तेजाब’ या चित्रपटात अनिल कपूरबरोबर काम केले. हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाला. तिचा नृत्याविष्कार व अभिनय यामुळे ती सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. तसेच या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. यानंतर माधुरी अनिल कपूरबरोबर अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

यादरम्यान तिची भूमिका असलेले राम लखन (1989), परिंदा (1989), किशन कन्हैय्या (1990) आणि प्रहार (1991) हे चित्रपट यशस्वी झाले. वर्ष 1990 मध्ये तिने इंद्रकुमार यांच्या “दिल’ चित्रपटात आमिर खानबरोबर काम केले. हा चित्रपट त्यावर्षी बॉक्‍स ऑफिसवर सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

“हम आप के है कौन’ हा चित्रपट आबालवृद्धांना आवडला. त्यातील गाणी प्रेक्षक गुणगुणू लागले. घरगुती समारंभात त्यातील नाच होऊ लागले. या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न मिळवत हिंदी चित्रपटसृष्टीच्या तत्कालीन इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात व परदेशात मिळून 80 कोटी रुपयांची कमाई केली. सहजसुंदर अभिनयाला नृत्याची जोड असल्याने अनेक गाणीही सुपरहिट झाली. 17 ऑक्‍टोबर 1999 रोजी माधुरी अमेरिकेतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने यांना माधुरी चित्रपटांत काम करत होती याची माहिती नव्हती. जवळ जवळ 12 वर्षे अमेरिकेतील वास्तव्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्‍टोबर 2011मध्ये मुंबईमध्ये परत आली.

माधुरीने वर्ष 2014 पासून मुलांचे हक्‍क व बाल-तस्करी टाळण्यासाठी युनिसेफचे काम करण्यास सुरुवात केली. तसेच मुलींच्या सबलीकरणासाठी लीलावती हॉस्पिटलने आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये भाग घेतला. मध्य प्रदेश सरकारने मातृ आणि बाल आरोग्य मोहिमेसाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्‍त केले होते. माधुरीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.