चर्चेत | हे तर पराभूत जितेंद्र!

– हेमंत देसाई

राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक असलेले जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याबाबत…

गेल्यावर्षी ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसचा त्याग करत, भाजपचे कमळ हाती घेतले होते. दहा महिन्यांपूर्वी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर त्यांचे मन वळवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. परंतु आज ते आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अस्वस्थच आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात नवज्योतसिंग सिद्धू यांनी बंड पुकारले आहे. कॉंग्रेसला आणखी गाळात टाकण्याची तयारी सर्वांनी मिळून सुरू केलेली दिसते.

या पार्श्‍वभूमीवर, माजी केंद्रीय मंत्री आणि राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक असलेले जितीन प्रसाद यांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खरे तर 2019 मध्येच प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. कॉंग्रेस पक्ष सोडण्याचे कारण विचारले असता, त्या पक्षात बेदिली माजली असून, तेथे राहून जनतेचे प्रश्‍न आपण सोडवू शकत नाही असे वाटले, हे उत्तर त्यांनी दिले. भाजप हाच आता एकमेव राष्ट्रीय पक्ष उरला असून, देशासमोरील संकटांचे निवारण करण्याची ताकद फक्‍त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच असल्याचा साक्षात्कार प्रसाद यांना झाला आहे. त्यांनी कॉंग्रेसमधील घराणेशाहीवरही टीका केली आहे.

वास्तविक जितीन प्रसाद यांचे वडील आणि आजोबा कॉंग्रेसमध्ये महत्त्वाच्या स्थानावर होते. नेहरू-गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिल्याचा “प्रसाद’ तिन्ही पिढ्यांना मिळाला. घराणेशाहीचे सर्व फायदे लाटणाऱ्या प्रसाद यांनी ही टीका करणे हे संतापजनक आहे. आपल्या वैयक्‍तिक फायद्यासाठी प्रसाद यांनी विचारसरणी बाजूला ठेवून भाजपात प्रवेश केल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली. सिब्बल यांच्या टीकेला उत्तर देताना, शिवसेनेबाबत युती केली, तेव्हा पक्षाची काय विचारसरणी होती? कॉंग्रेसने पश्‍चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांची साथ केली, तेव्हा नेमका कोणता विचार केला होता? असे प्रश्‍न प्रसाद यांनी विचारले.

वास्तविक प्रसाद यांचा विरोध होता, तर त्यांनी तो तेव्हाच प्रकट करणे आवश्‍यक होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस सामील होत असताना प्रसाद यांनी त्यास विरोध केल्याचे ऐकिवात आले नाही. तसेच प. बंगाल विधानसभा निवडणुकीची जबाबदारी प्रसाद यांच्यावर सोपवण्यात आली होती, तेथे कॉंग्रेसचा पूर्णतः पराभव झाला. खुद्द प्रसाद यांचा मागच्या दोन लोकसभा निवडणुकांत दारुण पराभव झाला होता. त्यानंतरच्या काळात कॉंग्रेसमधील बंडखोर जी-23 नेत्यांच्या गटात ते सामील झाले होते. ब्राह्मण चेतना परिषद भरवून, कॉंग्रेसच्या विचारसरणीशी विसंगत कृत्य त्यांनी केले. आता आठ महिन्यांनी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत.

योगी आदित्यनाथ यांना उ. प्रदेशचे मुख्यमंत्री बनवल्यानंतर नाराज झालेल्या तेरा टक्‍के ब्राह्मणांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीच भाजपने प्रसाद यांना पक्षात घेतले आहे. महाराष्ट्र युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्‌विटर हॅंडलवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्रसाद हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाजूला बसले असून, या दोघांच्या मध्ये हनुमानाची छाती फाडून दाखवतानाची मूर्ती आहे. यावरून “काय प्रतीकात्मक फोटो आहे. इथे हनुमान छाती फाडून दाखवत आहेत. भगवान श्रीराम यांच्या प्रति निष्ठा व्यक्‍त करत आहेत आणि तेथे जितीन प्रसाददेखील आहेत,’ असे ट्‌विट तांबे यांनी केले आहे.

प्रसाद यांनी 2001 साली युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून कामाला सुरुवात केली. 2004 मध्येच त्यांना शहाजहानपूरमधून लोकसभेचे तिकीट मिळाले आणि ते विजयी झाले. लगेच केंद्रीय पोलाद राज्यमंत्री म्हणून त्यांची कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी निवड केली. 2009 साली ते पुन्हा निवडून आले. मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2017च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये तर त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. मागच्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्याचे समर्थन प्राप्त करण्यात ते अयशस्वी झाले आणि ब्राह्मणांनीही त्यांना बिलकुल भाव दिला नव्हता. प्रसाद हे लोकांना कधीही उपलब्ध नसायचे, अशी त्यांच्याबद्दलची तक्रार होती.

मात्र हे सर्व विसरून, हिंदी व इंग्रजी चॅनेलवाल्यांनी प्रसाद यांच्या भाजप प्रवेशास प्रमाणाबाहेर महत्त्व दिले. 2019 सालीही लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव चाखावा लागला होता. अलीकडेच त्यांच्या मतदारसंघात झालेल्या एका पाहणीत 72 टक्‍के लोकांनी जितीन प्रसाद यांना आपण ओळखतच नसल्याचे सांगितले. 52 टक्‍क्‍यांनी सांगितले की, प्रसाद यांनी भाजपात जाऊन चूक केली आहे. तर अनेकांनी ते कोणत्या पक्षात जातात, याला आमच्या दृष्टीने महत्त्व नाही, असे स्पष्ट केले. एकूण 90 टक्‍के स्थानिक मतदारांना प्रसाद यांच्या पक्षांतराचे महत्त्व वाटत नसल्याचे पाहणीत दिसून आले. उत्तर प्रदेशातील प्रश्‍नांबाबत कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आपल्याशी सल्लामसलत करत नाहीत.

शहाजहानपूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष बदलताना आपला सल्ला घेण्यात आला नाही, समाजवादी पार्टीतून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्यांना अधिक महत्त्व मिळत आहे, अशा प्रसाद यांच्या तक्रारी होत्या. मात्र प्रसाद यांच्या आगमनामुळे भाजपला फार काही लाभ मिळण्याची सुतराम शक्‍यता नाही. उ. प्रदेशात भाजपचे 58 ब्राह्मण आमदार आहेत. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, ब्रिजेश पाठक, आशुतोष टंडन, सतीश द्विवेदी हे मंत्री तसेच हृदयनारायण दीक्षित, लक्ष्मीकांत वाजपेयी, महेंद्रनाथ पांडे व रामपती राम त्रिपाठी यांच्यासारखे अनुभवी नेते भाजपकडे आहेत. जो माणूस आपला मतदारसंघ राखू शकत नाही, तो भाजपला असे काय देणार? कॉंग्रेसची प्रतिमा खराब करणे व कॉंग्रेसचे मनोधैर्य खच्ची करणे एवढ्यापुरताच या पक्षांतराचा झाला तर उपयोग आहे. कॉंग्रेस पक्षसंघटना वाढवण्यासाठी प्रसाद यांचे कोणतेही विशेष योगदान नव्हते. तरीही मीडियाच्या माध्यमातून प्रसाद यांचे ढोल वाजवले जात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.