तंत्रज्ञान : आयओटीने होणार कायापालट

-महेश कोळी

“इंटरनेट ऑफ थिंग्ज’ हा विषय सध्या आपल्या सर्वांच्या जीवनाशी जोडलेला एक महत्त्वाचा विषय म्हणून चर्चेत आला आहे. नेटवर्किंग क्षेत्रात हे एक मोठे यश आहे, असे मानले जाते.

दैनंदिन जीवनात इंटरनेट ऑफ थिंग्जचा उपयोग इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, स्मार्ट डिव्हाइस आणि गॅजेट्‌स एकमेकांना जोडण्यासाठी केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने या नेटवर्कमध्ये समाविष्ट केलेली डिव्हाइस एकमेकांना डेटा पाठवितात आणि एकमेकांकडून डेटा स्वीकारतात. या क्षेत्रात होत असलेले संशोधन भविष्यात आपल्या जीवनाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकणार आहे. कल्पना करा, तुम्ही तुमच्या कार्यालयात किंवा घरात गेलात आणि दिवे, एअर कंडिशनर आपोआप ऑन आणि ऍडजस्ट झाले तर कसे वाटेल? इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानामुळेच हे शक्‍य आहे. हे केवळ एक छोटेसे उदाहरण आहे. या नेटवर्कमध्ये जोडली गेलेली डिव्हाइस आपला डेटा डिजिटल रूपात परावर्तित करू शकतात आणि एकमेकांशी संपर्क साधू शकतात. इंटरनेटशी कनेक्‍ट होऊन ही डिव्हाइस आपल्याला नियंत्रित करता येतात.

जेव्हा एखादा नवीन शोध लागतो किंवा नवीन तंत्रज्ञानाचे आगमन होते, तेव्हा त्याच्या मागे काही विशिष्ट विचार असतो. हे तंत्रज्ञान आज लाखो, कोट्यवधी लोक वापरत असले तरी काही दिवसांपूर्वी ते केवळ कल्पनेतच होते. परंतु अशा कल्पनेच्या मागे मानवी मेंदूत रेंगाळणारे असंख्य प्रश्‍न असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या बाबतीत असेच घडत गेले. इंटरनेट ऑफ थिंग्ज हे एक पूर्णपणे नवे क्षेत्र असले तरी त्याची सुरुवात आरएफआयडी म्हणजे रेडिओ फ्रिक्‍वेन्सी आयडेन्टिफिकेशन तंत्रज्ञानाच्या काळातच झालेली होती. आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज आदी उपकरणांना जर एखादा युनिक ऍड्रेस दिला तर सेन्सर तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि वायरलेस नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही उपकरणे एकमेकांशी जोडू शकतो.

असे झाल्यास आपण ही सर्व उपकरणे संगणकाच्या साह्याने नियंत्रित करू शकतो. हा विचारच इंटरनेट ऑफ थिंग्ज या संकल्पनेचा पाया होता. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांना आजही अनेक प्रश्‍न पडले आहेत. उदाहरणार्थ, दैनंदिन जीवनात आपण जी यंत्रे वापरतो ती एकमेकांना जोडता येतील का? शक्‍य असेल तर ते कसे करता येईल? ही यंत्रे एकमेकांना जोडली जावीत आणि त्यांनी एकमेकांशी संपर्क साधावा या दृष्टीने कोणत्या प्रकारचे वायरलेस नेटवर्क तयार करावे? इंटरनेटची जी सध्याची पायाभूत संरचना आहे, त्यात ही यंत्रे इंटरनेटच्या साह्याने परस्परांना जोडण्यासाठी कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत? वायरलेस एन्व्हायर्नमेन्टमध्ये या सर्व यंत्रांना ऊर्जेचा पुरवठा कसा करता येईल? हे तंत्रज्ञान किफायतशीर कसे करता येईल? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी सातत्याने संशोधन होत आहे. या संशोधनांच्या आधारावर आपल्याला असे म्हणता येईल की, निकटच्या भविष्यातच दैनंदिन जीवनात इंटरनेट ऑफ थिंग्जच्या वापरामुळे अनेक आश्‍चर्यकारक बदल घडून येणार आहेत.

इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजेच आयओटीच्या मदतीने आपण आपली घरे स्मार्ट बनवू शकू. घर स्मार्ट बनविण्यासाठी घरातील सर्व उपकरणे इंटरनेटला जोडलेली असू शकतात. ही उपकरणे सेन्सरच्या मदतीने घराचे हीटिंग, एसी तसेच दरवाजांनाही नियंत्रित करू शकतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही घरी नसाल आणि बाहेर पडताना घरातील एखादा दरवाजा चुकून उघडाच राहिला आहे. जर त्या दरवाजाला सेन्सर लावलेला असेल तर अशा वेळी काही वेळानंतर तो दरवाजा आपोआप बंद होईल. दरवाजा बंद करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइलचाही उपयोग करू शकाल. अशा प्रकारे घरापासून दूर असूनसुद्धा मोबाइल फोनच्या मदतीने घरातील सर्व दरवाजे तुम्ही बंद करू शकाल. केवळ घरातील दरवाजेच नव्हे तर एसी, वॉशिंग मशीन, फ्रिज अशी उपकरणेही तुम्ही घरापासून दूर राहून नियंत्रित करू शकाल. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या मदतीने इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे एकमेकांशी जोडून ऑफिससुद्धा स्मार्ट बनविता येणार आहे.

आता तर कृषी क्षेत्रातसुद्धा इंटरनेट ऑफ थिंग्जचा उपयोग होऊ लागला आहे. शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी ट्यूबवेलचा वापर करतात. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या मदतीने शेतकरी घरबसल्या ट्यूबवेल नियंत्रित करू शकेल. त्याचबरोबर सेन्सर नेटवर्कच्या मदतीने शेतात लावलेल्या सेन्सर्सच्या माध्यमातून जमिनीची आर्द्रता, कोरडेपणा, हवामान आदींशी संबंधित माहिती मोबाइलमध्ये शेतकऱ्याला मिळू शकेल. मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतकरी योग्य देखभाल करून पिकाचे उत्पादन वाढवू शकेल. वैद्यकीय क्षेत्रात इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. यात बॉडी सेन्सर नेटवर्कचा वापर सर्वाधिक लोकप्रिय आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शरीरावर लावलेल्या सेन्सर्सच्या माध्यमातून शरीराचे तापमान, हृदयाची गती, रक्‍तदाब आदी व्यक्‍तीच्या प्रकृतीसंबंधीची माहिती एकत्रित करून डॉक्‍टरांच्या मोबाइलवर किंवा संगणक प्रणालीवर पाठविता येऊ शकते. अशा प्रकारे डॉक्‍टर घरबसल्याच रुग्णाच्या तब्येतीविषयी माहिती मिळवू शकतील. अशा प्रकारे हे तंत्रज्ञान आपल्या जीवनाला वेगळाच आकार देण्यासाठी तयार आहे, हे आपल्याला समजू शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.