नोंद : “विक्रांत’ लवकरच…

– विनय खरे

सागरी सीमांच्या संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेता नौदलाच्या ताफ्यात लवकरच आयएनएस विक्रांत दाखल होण्यास सज्ज आहे.

संरक्षण दलासाठी मोठ्या प्रमाणावर बाह्य देशांवर आपण विसंबून आहोत. काही वेळा त्याचा फटका बसून सुटे भाग मिळण्यास अडचणी येतात. परिणामी येथील साहित्याची निर्मिती, दुरुस्ती प्रक्रिया मंदावते, थांबते. देशात अनेक संरक्षणविषयक बाबी उत्पादित करण्यासाठी खासगी सरकारी उत्पादन क्षमतेत वाढ करण्यावर जोर दिला जात आहे. काही संरक्षण घटकांची आपण आता निर्यातही करत आहोत, हे विशेष.

संरक्षण क्षेत्राचा विचार करता नौदलाच्या विमानवाहू नौकांच्या आयातीत आपण आत्मनिर्भर नव्हतो. काही वर्षांपूर्वी बरीच चर्चा होऊन अखेर भंगारात काढलेली देदीप्यमान इतिहासाची आयएनएस विक्रांत असेल किंवा आयएनएस विराट यांचे आपण गौरवशाली स्मारकात रूपांतर करू शकलो नाही. त्या दोन्ही परदेशी बनावटीच्या होत्या. सध्या कार्यरत असलेली आयएनएस विक्रमादित्य हीदेखील रशियन बनावटीची पूर्वाश्रमीची गोर्शकव्ह तिलाही अव्वाच्या सव्वा रक्‍कम देऊन घ्यावी लागली. त्याचा परिणाम विक्रांत आणि विराटच्या निवृत्ती काळावर झाला. कारण त्या कालखंडात आपल्या सामुद्री सीमांच्या रक्षणासाठी एक तरी विमानवाहू नौका अत्यावश्‍यक होती. खरं पाहता आपल्याला संभाव्य धोका पाहून पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण या तिन्ही बाजूला एक एक अशा नौकेची गरज आहे. त्यामुळे स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकेची गरज आपल्या दृष्टीने मोठी होती. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत आपण अनेक क्षेत्रांत भरीव कामगिरी करत शेजारील राष्ट्रांपेक्षा आपण वेगळे आहोत हे जगाला दाखवून देण्यात यशस्वी झालो आहोत. परिणामी, सामुद्री रक्षणात एक जबाबदार राष्ट्र म्हणून आपल्या नौदलाची ओळख निर्माण झाली.

मागील विक्रांतच्या नावे ही नवी नौका तयार होत असताना अनेकांना प्रश्‍न पडेल की, जुनेच नाव का? तर याचे उत्तर आहे, भारतीय नौदलात अनेक जुन्या नावाच्या पाणबुडी नौकांनी पराक्रम गाजवला आहे. त्यांची आठवण आणि पराक्रम समोर यावा, जवान अधिकारी वर्गाला त्यातून स्फूर्ती मिळावी हा त्यामागे उद्देश असल्याचे सांगितले जाते. नौदल स्मारकात रूपांतर होऊ न शकलेली “विक्रांत’ या रूपाने सर्वांसमोर राहील. दक्षिणेकडील कोचीन शिपयार्ड हिची निर्मिती करत असून काही अपवाद वगळता बहुतांश भाग स्वदेशी बनावटीचे आहेत.

गेल्याच महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी कोचीनला भेट देऊन हिच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतला होता. त्याचवेळी विक्रांत ऑगस्टपर्यंत पूर्णत्वाला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार तिच्या बेसीक चाचण्या (कोचीन शिपयार्डमध्ये) घेतल्या गेल्या. आता लवकरच खोल समुद्रात तिला उतरवून पुढील चाचण्या होतील. तिच्या सागरी चाचण्या पूर्ण झाल्यावर नौदलाकडून अनेक तपासण्या चाचण्या पूर्ण केल्यावर ती अंतिमतः नौदल ताफ्यात समाविष्ट केली जाईल. तोपर्यंत पुढील वर्षाचा मध्य म्हणजे ऑगस्ट महिना उजाडेल. हिंद महासागरातील खोल समुद्रात चाचणीसाठी नेण्यास कोचीन शिपयार्ड आणि नौदल तयारीला लागले आहे.

विक्रांतला विक्रमादित्यच्या जवळपास असेल असे बनवण्यात आले आहे. दीड हजार नौसैनिक आणि दोनशे अधिकारी यांच्या तैनाती बरोबरच मिग 29 सारखी 26 अत्याधुनिक विमाने राहू शकतात. शिवाय, दहा हेलिकॉप्टर अथवा लहान विमाने अतिरिक्‍त सामावून घेता येतील. याचा पृष्ठभाग (डेक) 1.5 एकराचा असून धावपट्टी देखील मोठी आहे. कामोव्ह 31, मल्टी रोल एम एच 60, हवाई हल्ल्याची सूचना देणारी, पाणबुडी जवळपास असल्याची सूचना देणारी सोनार यंत्रणा आदींसह अन्य शस्त्र सज्जता असेल ती वेगळीच.

विक्रमादित्य गेल्या काही काळात अनेकदा दुरुस्तीसाठी कारवार तळावर आणल्याने देशाच्या सागरी सीमेवर विमानवाहू नौकेची गरज प्रकर्षाने जाणवते. गेल्या काही काळात चीनचे आरमार सातत्याने भारतीय हद्दीजवळ घुसखोरी करण्यासाठी आतूर असलेले पाहण्यास मिळाले आहे. मात्र, भारतीय नौदल चुस्त असल्याने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यात तटरक्षक दल नि नौदल यशस्वी ठरले आहे.

सध्या नौदलाच्या 44 युद्धनौकांपैकी 42 ची बांधणी विविध गोदीत नौदलाच्या गरजेनुसार केली जात आहे. यातही 75 टक्‍के स्वदेशी बनावटीचे भाग असतील. भारताच्या हिंद महासागरातील व्यापार उदिमास शांती नि स्थैर्य मिळण्याच्या दृष्टीने या “विक्रांत’कडे पाहिले जाते. एकूणच इंडो पॅसिफिक क्षेत्रात नौदलाचे सामर्थ्य या दुसऱ्या विमानवाहू नौकेच्या दाखल होण्याने वाढेल, हे निश्‍चित!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.