विविधा : स. गो. बर्वे

– माधव विद्वांस

सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री स. गो. बर्वे यांचे आज पुण्यस्मरण.
स. गो. बर्वे यांचा जन्म 27 एप्रिल, 1914 रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, पुणे व नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते केम्ब्रिजला गेले आणि तेथून बीए, अर्थशास्त्र आणि आयसीएस या तीनही परीक्षा (ट्रायपॉस) उत्तीर्ण झाले.

वर्ष 1936 मध्ये ते भारतात परत आले व अहमदाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून हजर झाले व 15 ऑगस्ट, 1947 रोजी ध्वजारोहण करण्याचा मान त्यांना मिळाला. पुणे मनपा अस्तित्वात आल्यावर सुरुवातीची तीन वर्षे त्यांनी आयुक्‍त म्हणून काम पाहिले. त्यांच्या कारकिर्दीत हडपसर औद्योगिक वसाहती, संभाजी, पेशवे, शाहू ही उद्याने तसेच संभाजीपूल व धार्मिक स्थळे हलवून काही रस्ते रुंद करणे इ. कामे झाली. जंगली महाराज रस्ता याच काळात पूर्ण झाला.

1953 मध्ये पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्यामध्ये कामासाठी बोलावून घेतले. त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवायचं ठरवलं, त्यासाठी त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला.

तथापि, सेवामुक्‍त होण्याआधीच 12 जुलैला पानशेतची दुर्दैवी घटना घडली. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मदत-पुनर्वसन कार्यासाठी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी समिती नेमली. पुराच्या दुसऱ्या दिवसापासून अडीच महिने ते कार्यालयातच राहत होते. चार दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाला. खडकवासल्याचे पाणी बंद झाल्याने मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यांत पूर्ण झाला. दोन आठवड्यात तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. 100 केंद्रात 36 हजार नागरिकांना निवारा मिळाला. पूरस्थिती नियंत्रणात आणत असतानाच सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत प्रशंसनीय काम केले. त्यामुळे स. गो. बर्वे यांचे हेच काम पुणेकरांच्या अधिक लक्षात राहिले.

यानंतर यशवंतरावांनी त्यांना कॉंग्रेस पक्षात घेऊन राजकारणात आणले. 1962 च्या निवडणुकीत शिवाजीनगर येथून ते निवडणुकीस उभे राहिले. निवडून आल्यावर महाराष्ट्राचे अर्थमंत्री झाले. कालांतराने वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हास्तरावर औद्योगिक वसाहत एमआयडीसी स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. त्यांच्या प्रयत्नाने 10 हजार एकर जमीन संपादन करून पुण्याजवळ भोसरी येथे एमआयडीसी सुरू झाली व पुण्याचे नाव औद्योगिक नकाशावर आले. या यशस्वी कामाची दखल घेत शास्त्रीजींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागात नेमले. त्यांनी भारताचे नियोजन, आर्थिक धोरण आणि सुशासनावर इंग्रजीतून मार्गदर्शनपर ग्रंथलेखनही केले.

1967 मध्ये त्यांनी उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून निवडून आले. दुर्दैवाने लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याआधीच त्यांचे 6 मार्च, 1967 रोजी निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.