न्यायालयाच्या समन्सना इम्रान खान दाद देत नाहीत. अटक केल्यास मला ठार मारले जाईल, असे ते म्हणतात. कायद्याची पत्रासही बाळगायला इम्रान खान तयार नाहीत.
“माझ्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. माझ्या अटकेची तयारी देशाचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधात सुरू असलेले सर्व खटले थांबवण्यासाठी आहे,’ असे उद्गार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि “पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी काढले आहेत. आपल्याला अटक करून नवाझ यांना सगळ्या खटल्यांमधून मोकळे करण्याचा कट लंडनमध्येच शिजल्याचा इम्रान यांचा आरोप आहे. 18 मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचे आश्वासन इम्रान यांनी दिले असतानाच, त्यांना त्यापूर्वीच अटक करण्यासाठी पोलीस व सुरक्षादलाचे जवान त्यांच्या निवासस्थानाजवळ दाखल झाले. पोलीस व पीटीआयचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे लाहोरमध्ये तणाव निर्माण झाला. त्यावेळी, आपले अपहरण करून हत्या करण्याचा डाव असल्याचा आरोप इम्रान यांनी केला.
अर्थात, पोलीस त्यांच्या निवासस्थानाजवळ गेले होते, तेव्हा इम्रान आपल्या घरीच नव्हते. पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तू तोशाखाना विभागात जमा केल्या नाहीत. तसेच किरकोळ रक्कम देऊन त्यांनी या भेटवस्तू खरेदी केल्या आणि जादा भावाला विकल्या, असा इम्रान यांच्यावर आरोप आहे. इस्लामाबादच्या सत्र न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू असून, सुनावणीला ते सातत्याने गैरहजर राहत आहेत. त्यामुळे 28 फेब्रुवारीला इम्रान यांच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्यालाही दाद न दिल्यामुळे पुन्हा एकदा वॉरंट जारी काढले गेले. शिवाय एका महिला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशाला धमकावल्याचाही इम्रान यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानात वेळोवेळी राजवटी बदलतात आणि नवा सत्ताधारी जुन्या सत्ताधाऱ्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतो. बेनझीर भुट्टो आणि नवाझ शरीफ, तसेच मुशर्रफ विरुद्ध नवाझ शरीफ या लढाईत असेच प्रकार घडले होते.
पाकिस्तानातील लष्करशहा वा पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत, असे कळल्यास कोणालाही आश्चर्य वाटत नाही. 2018 साली इम्रान खान सत्तेवर आले, तेव्हा त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती त्यांनी तोशाखाना विभागाला देण्यास साफ नकार दिला. ही माहिती उघड केल्यास, अन्य देशांशी असलेल्या संबंधांवर विपरीत परिणाम होईल, असा युक्तिवाद इम्रान यांनी केला. विशेष म्हणजे, काही भेटवस्तूंची आपण विक्री केल्याची कबुली त्यांनी निवडणूक आयोगाजवळ दिली होती. इम्रान यांनी काही भेटवस्तू स्वतःकडे ठेवण्याच्या बदल्यात पैसे दिले आहेत. परंतु त्यांचे वर्तन अनैतिक आहे, असे निरीक्षण नोंदवत, निवडणूक आयोगाने त्यांना सार्वजनिक पदावर राहण्यास बंदी घातली. तसेच त्यांचे संसद सदस्यत्वही रद्द केले. भरीस भर म्हणून की काय, पाकिस्तान-मुस्लीम लीग-एम पक्षाचे नेते मोहसिन रांझा यांनी, इम्रान यांनी आपल्याला मारण्याचा कट केला होता, असा आरोप केला आहे.
थोडक्यात, दिवसेंदिवस इम्रान यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. मात्र हे काहीही असले, तरी इम्रान यांना तुरुंगात टाकण्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांना सातत्याने अपयशच येत आहे. सरकारला याबाबत लष्कराचा पाठिंबा असूनही, इम्रान यांना तुरुंगात डांबता आलेले नाही. शाहबाझ आणि अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह यांच्या धमक्यांना इम्रान भीक घालत असल्याचे अजिबात दिसत नाही. आपल्या निवासस्थानापाशी समर्थकांना जमवून, पोलिसांवर दगडफेक करून इम्रान यांनी शक्तिप्रदर्शन केले आहे. झुल्फिकार अली भुट्टो यांच्यावर एकेकाळी सरकारने कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही असा तमाशा करणे जमले नव्हते. झुल्फिकार अली भुट्टो हे अधिक अनुभवी नेते असूनदेखील त्यांना जे जमले नाही, ते इम्रानने करून दाखवले आहे.
सरकारशी दोन हात केले, तर सरकार माघार घेईल, असा इम्रान यांचा आडाखा असावा. त्यासाठी हिंसाचार झाला, तरी बेहत्तर अशी त्यांची भूमिका आहे. आपल्या लाहोरमधील निवासस्थानाच्या रक्षणार्थ इम्रान यांनी टोळीवाल्यांची मदत घेतली आहे. शिवाय गिलगिट-बाल्टिस्तानचे पोलीस कमांडोही त्यांच्या दिमतीला आहेत. लाठ्या चालवून आणि गोळीबार करून इम्रानच्या मुसक्या आवळायच्या असतील, तर याची जबाबदारी लष्कर प्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी घ्यावी, असे शाहबाझ यांना वाटत आहे. मुनीर यांनीच इम्रानविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यास पंतप्रधानांना सांगितले होते. इजिप्तचे माजी अध्यक्ष मुहम्मद मोर्सी यांना धडा शिकवावा, अशी तेथील लष्कराची इच्छा होती. तर पाकिस्तानातील लष्कराने इम्रान यांना पंतप्रधानपदी येण्यास मदत केली, पण त्याच लष्करातले अधिकारी नंतर त्यांच्या विरोधात गेले. आपल्याला पदच्युत करण्याचा कट अमेरिकेने रचल्याचा आरोप इम्रान यांनी जाहीरपणे केला होता.
नवाझ शरीफ हेदेखील तुरुंगात टाकल्यास मला संपवले जाईल, असे म्हणत होते. मुशर्रफ राजवटीतच ते परदेशात निघून गेले. परंतु इम्रान यांच्या विरोधातील आरोप हे फारसे गंभीर नाहीत किंवा ते बनावट आहेत, असा लोकांचा समज असावा. भेटवस्तूंचा गैरवापर हा आसिफ अली झरदारी, यूसुफ गिलानी, नवाझ शरीफ प्रभृतींच्या काळातही झाला. अध्यक्ष व पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांनी भेटवस्तू लांबवणे, वापरणे, असे प्रकार नेहमीच होत आले आहेत. तसेच पाकिस्तानी लष्करात गटबाजी असून, त्याचा आपल्याला फायदा करून घेता येईल, असा इम्रान यांचा हिशेब आहे. इम्रान यांना तुरुंगात टाकण्यात आल्यास, पीटीआय पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास मी तयार आहे, असे इम्रान सरकारमधील माजी परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.
थोडक्यात, इम्रान यांना जेलयात्रा घडल्यास पर्याय उपलब्ध आहे, असेच संकेत कुरेशी देत असून, यामागे सरकारची फूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इम्रान प्रकरणामुळे पाकिस्तान केवळ दिवाळखोरच नाही, तर अराजकाच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.