– हिमांशू
निवडणुकीच्या प्रचारसभेत “फॅक्ट्स अँड फिगर्स’सह बोललं पाहिजे आणि आपले मुद्दे जनसमुदायाला पटवून दिले पाहिजेत, असं कनिष्ठ नेत्यांना सांगणाऱ्या वरिष्ठ नेत्यांचा एक काळ होता. आता “फॅक्ट्स’ची गरज फारशी कुणाला भासत नाही; किंबहुना “फॅक्ट्स’ विसरायला लावणं हेच मोठं कौशल्य मानलं जाण्याचा काळ आलाय. “फिगर्स’ एक तर बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही माहीत नसतात आणि मांडल्या तरी कुणी ताळा करून बघत नाही. त्याऐवजी मनोरंजन किती झालं, यावर ऐकणाऱ्यांचं लक्ष असतं आणि ऐकणाऱ्यांना मनोरंजनाकडे वळवणं हे बोलणाऱ्याचं कसब असतं.
“फॅक्ट्स अँड फिगर्स’ची अशा प्रकारे वासलात लावल्यानंतर नेतेमंडळी काहीही बोलू शकतात आणि ऐकणारे काहीही ऐकू शकतात. (इथं खरं आणि खोटं याविषयी बोलण्याचा बिलकूल इरादा नाही हे कृपया ध्यानात घ्यावे. कारण निवडणूक प्रचार केव्हाच खऱ्याखोट्याच्या पलीकडे गेलाय, याची विनम्र जाणीव आम्हाला आहे.)
परंतु जिभेला हाड दिलेलं नाही म्हटल्यावर ती वाट्टेल तशी वळवलीच पाहिजे, हे सूत्र निवडणुकीमध्ये रूढ झाल्यामुळे आपला समाज आता चांगलाच “बोल्ड’ बनत चाललाय. आतापर्यंत पडद्याआड राहिलेल्या अनेक गोष्टी निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं लोकांसमोर येतात आणि अनेकदा त्या समाजाला अंतर्मुख करणाऱ्या असतात. अशा स्पष्टवक्तेपणाची गांभीर्यानं दखल घेण्याऐवजी खिल्ली उडवणारे लोक आपल्याच समाजात आहेत आणि ते संबंधितांविरुद्ध तक्रारीही करतात, हेच दुर्दैव!
तमिळनाडूत सध्या निवडणुकीचं वातावरण बरंच तापलंय. अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष आमने-सामने आहेतच; शिवाय अभिनेते कमल हासन यांचा पक्षही निवडणुकीत उतरलाय. निवडणूक “रंगतदार’ होणार याची प्रत्येकाला खात्री आहे. त्यामुळेच “लक्षवेधी’ नेते तयारीनिशी पुढं सरसावलेत. द्रमुकचे नेते दिंडीगल लिओनी यांनी आतापर्यंत सर्वात जास्त “लक्षवेधी’ भाषण करण्याचा मान मिळवलाय. कोईमतूरच्या सभेत लिओनी यांनी जे “फॅक्ट्स अँड फिगर्स’ मांडले, त्याला तोड नाही. आपल्या देशात सध्या परदेशी प्रजातींच्या गायी जास्त दिसतात, याविषयी त्यांना कमालीचं दुःख आहे.
या गायी दिवसाकाठी चाळीस-चाळीस लिटर दूध देतात आणि दूध काढण्यासाठी यंत्रांचा वापर करावा लागतो, याविषयीची खंतही त्यांनी व्यक्त केली. मग मात्र त्यांची “सटकली’च! अशा परदेशी गायींचं दूध पिऊन आपल्याकडील महिलांची “फिगर’ बिघडली आहे, अशी “फॅक्ट’ त्यांनी सांगितली. लिओनी यांच्या मते, पूर्वी महिलांची “फिगर’ इंग्रजी “आठ’ आकड्यासारखी होती. आपल्या मुलांना त्या कमरेवर ठेवत असत. आता त्यांची मुलं कमरेवरून घसरून पडू लागलीत… वगैरे! यावर प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं आणि तशी ती उमटलीही. पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख कनिमोळी यांच्याकडे लिओनींविरुद्ध तक्रार दाखल झालीय.
परंतु सगळ्यात इंटरेस्टिंग भाग असा की, निवडणुकीच्या प्रचारसभेत लिओनी जेव्हा महिलांच्या “फिगर’संबंधी बोलत होते, तेव्हाच त्यांच्यासमोर एक “फॅक्ट’ आणली गेली. एक कार्यकर्ता व्यासपीठावर येऊन त्यांच्या हातात रेशनिंगचे तांदूळ देऊन गेला. सत्ताधाऱ्यांनी पुरवलेल्या या तांदळाचा दर्जा अत्यंत खराब असून, त्याविषयी बोला, असं कार्यकर्त्यानं सुचवलं. लिओनी तांदळाविषयी थोडावेळ बोललेही; पण नंतर त्यांच्या भाषणाची गाडी पुन्हा एकदा महिलांच्या “फिगर’वरच आली. असे “लक्षवेधी’ जोपर्यंत आहेत, तोपर्यंत “टॅक्स-फ्री’ करमणूक अबाधित आहे!